एवस्प्रेस मार्गावर यावर्षी १६८ अपघात; ६८ जणांचा मृत्यू

नवी मुंबई ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तसेच मुंबई-पुणे (राष्ट्रीय महामार्ग क्र.४८) येथे राज्य परिवहन विभाग (आरटीओ) तर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्याअंमलबजावणीसाठी परिवहन उपायुक्त तथा ‘रस्ता सुरक्षा कक्ष' प्रमुख भरत कळसकर यांची नियुवती करण्यात आली आहे.

सन २०२१ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०० अपघात झाले असून त्यात ८८ जणांचा मृत्यू तर १४६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर १६८ अपघात झालेले असून त्यात ६८ लोक मृत्युमुखी पडले असून ९२ जण गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच सन २०२१ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती जुन्या महामार्गावर २७८ अपघात झाले असून त्यात ८८ नागरिकांचा मृत्यू तर १४६ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे जुन्या महामार्गावर जानेवारी ते आक्टोबर २०२२ यादरम्यान २३१ अपघात झालेले असून १०२ लोक मृत्युमुखी पडले असून १६० लोक गंभीर जखमी झालेले आहेत.

रस्त्यावरील जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश देण्यात आले होते. या बैठकीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुना महामार्गावर वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या विशेषतः अतिवेगाने वाहन चालवणे, विना हेलमेट, विना सिटबेल्ट वाहन चालविणे आणि चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालविणे, चुकीच्या पध्दतीने मार्गिका बदलणे याबाबत वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण होण्याकरिता दीर्घकालीन जनजागृती आणि अंमलबजावणी करण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने दोन्ही महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या हेतुने वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती आणि जुन्या अशा दोन्ही महामार्गावर ६ महिन्यांसाठी २४ तास रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमाचे आयोजन परिवहन विभागामार्फत (आरटीओ) करण्यात आले आहे. सदर उपक्रमाची सुरुवात उद्या १ डिसेंबर २०२२ पासून होत आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यरत अधिकाऱ्यांकडून १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली असून त्यात ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यातील ६ पथके आणि १५ अधिकारी प्रत्येकी सदर दोन्ही महामार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहेत.

दरम्यान, रस्ता सुरक्षा जनजागृती आणि अंमलबजावणी उपक्रमांतर्गत सुरक्षा उपक्रम प्रथमच परिवहन विभागामार्फत (आरटीओ) महाराष्ट्र राज्यात सहा महिन्यांच्या कालावधीकरिता सुरु करण्यात आलेला आहे. सदर दोन्ही महामार्गावर रस्ता सुरक्षा निर्माण करण्याच्या हेतुने वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या प्रमुख उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिले ७ दिवस दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर आणि वाहनांवरील पीए सिस्टीम मार्फत जनजागृती आणि उद्‌घोषणा करण्यात येईल. त्यानंतर सर्व वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या हेतुने कारवाई करुन अंमलबजावणी करण्यात येईल. सदर उपक्रमासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस विभाग, महामार्ग पोलीस आणि स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य
घेण्यात येणार आहे.

रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्के पेक्षा जास्त अपघात चालकांच्या निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती आणि वाहतूक नियमांचे पालन न करणे यामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व चालक आणि नागरिकांनी स्वतःहून नियमांचे पालन करण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. -विवेक भीमनवार, आयुवत-परिवहन विभाग, महाराष्ट्र.

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संविधान दिनाचे औचित्य एक दिवसीय निःशुल्क सहलीचे आयोजन