एपीएमसी प्रशासनाचे वरातीमागून घोडे?

वाशी ः मागील १७ नोव्हेंबर २०२२ रोजी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात आग लागून २० ते २५ गाळे आगीच्या भक्षस्थानी पडले. तर सदर आग येथील कागदी पुठ्ठे, लाकडी खोके व्यवसायिकांनी केलेत्या अतिक्रमणामुळे अधिकच भडकल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणे रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने एक समिती गठीत केली आहे. मात्र, सदर अतिक्रमण होताना एपीएमसी प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले. आता एपीएमसी फळ बाजारात आग लागल्यावर अतिक्रमण विरोधात समिती गठित करणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्याचाच प्रकार असल्याचा आरोप एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांकडून होत आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून एपीएमसी मार्केट ओळखले जाते. त्यामुळे येथे रोज शेतमाल घ्ोऊन हजारो वाहनांची तसेच व्यापारी आणि ग्राहकांची वर्दळ असते. तर एपीएमसी मार्केट मध्ये शेतमालावर आधारित इतरही जोड धंदे सुरु असून, त्यात पॅकिंग साहित्य अधिक लागत असते. त्यामुळे एपीएमसी बाजारात कागदी बॉक्स, लाकडाच्या पेट्या, गवत इत्यादी अधिक प्रमाणात दाखल होत असतात. एपीएमसी फळ बाजारात संरक्षण भिंतीलगत असलेल्या जागेत एपीएमसी प्रशासनाने कागदी खोके, पुठ्ठे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच या ठिकाणी शेड देखील बांधण्यात आले आहेत. परंतु, काही व्यापारी दिलेल्या जागे पुरता वापर न करता अतिरिक्त जागेचा वापर करुन खोके, पुठ्ठ्यांचा पसारा सर्वत्र मांडत आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजार परिसरात बकालपणा येत आहे. शिवाय एखादी आगीची घटना घडल्यास आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला देखील अडचणी येत आहेत. याबाबत नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने एपीएमसी प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, त्या सूचनांना एपीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष करीत केराची टोपली दाखवली आहे. दुसरीकडे एपीएमसी बाजार आवारातील अतिक्रमणांना खतपाणी घालत एपीएमसी प्रशासनाने अग्नि सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. मात्र, मागील १७ नोव्हेंबर रोजी एपीएमसी फळ बाजारात लागलेल्या आगीमुळे एपीएमसी बाजार समिती मधील अग्नि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने एपीएमसी प्रशासन जागे झाले आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासनाने आता पाच एपीएमसी बाजारांचे उपसचिव, कार्यकारी अभियंता आणि सुरक्षा अधिकारी यांची एक विशेष समिती गठीत केली आहे. सदर समिती पाचही एपीएमसी बाजारांचा अतिक्रमण बाबत पाहणी दौरा करुन येत्या आठ दिवसात एपीएमसी प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे. २१ नोव्हेंबर पासून याविषयी सदर समितीने फळ बाजाराची पाहणी सुरु केली असून, २२ नोव्हेंबर रोजी एपीएमसी भाजीपाला बाजाराची पाहणी करण्यात आली आहे.  या पाहणी दौऱ्या दरम्यान एपीएमसी बाजारातील अनधिकृत बांधकाम, वाढीव जागेचा वापर तसेच पार्किंगचा प्रश्न यामुळे एपीएमसी परिसरात दाटीवाटी होत आहे, असे या समितीच्या निदर्शनास आले आहे. मात्र, अग्निशमन दलाने वारंवार सूचना देऊन देखील दुर्लक्ष करीत आग लागल्यावर अतिक्रमणा विरोधात समिती गठित करणे म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्याचाच प्रकार असल्याचा आरोप आता एपीएमसी बाजारातील व्यापारी करीत आहेत.

एपीएमसी बाजार आवारात होत असलेल्या अतिक्रमण बाबत आपण वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, एपीएमसी  प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे एपीएमसी बाजार आवारात सध्या अतिक्रमण फोफावत असून, आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजार आवारात आग लागल्यावर अतिक्रमण विरोधात समिती गठित करणे म्हणजे वरातीमागून घोडे  नाचवण्याचाच प्रकार आहे.  - बाळासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना.

एपीएमसी प्रशासन द्वारे पाचही बाजारातील अनधिकृत बांधकाम, वाढीव जागेचा वापर तसेच सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष समिती गठीत केली आहे. या समितीचा पाहणी दौरा सुरु असून, येत्या ८ दिवसात सदर समिती एपीएमसी प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे. दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यात प्रथमदर्शनी बाजार समितीतील अनधिकृत बांधकाम, शेड, वाढीव जागेचा वापर आणि पार्किंगचा मुद्दा निदर्शनास आला आहे. - संध्या अढांगळे, उपसचिव - फळ मार्केट, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशी.

एपीएमसी फळ बाजारातील आगीच्या घटनेनंतर एपीएमसी प्रशासनाला घटनेचा अहवाल वृत्तांत पाठविला आहे. यामध्ये एपीएमसी प्रशासनाने अग्नि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आले आहे. - पुरुषोत्तम जाधव,  विभागीय अग्निशामक अधिकारी - वाशी.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘स्वच्छ सर्वेक्षण 2023' अंतर्गत पालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन