मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेचे लोकार्पण
ठाणे ः ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात बायपास, ईस्टर्न फ्री-वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका त्यासाठी काम करत आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यवत केला आहे.
कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या एका मार्गिकेचे १३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, गोपाळ लांडगे, सुधीर कोकाटे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा, आदि उपस्थित होते.
तिसऱ्या खाडी पुलाचे लोकार्पण झाले असून पुढील मार्गिका १ डिसेंबर रोजी सुरु करण्याची घोषणा करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी या पुलाचा विस्तार पटनीपर्यंत करण्याचा सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट केले. तीन हात नाका, माजिवडा जंक्शन येथेही लवकरच काम सुरु होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन तिसऱ्या कळवा खाडी पुलाबद्दल सादरीकरण केले. तसेच उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती दिली. दरम्यान, लोकार्पण सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलावरुन प्रवास केला. सदर मार्गिका तत्काळ लोकांसाठी खुली करण्यात आली. कळवा खाडी पुलाविषयीः ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून ठाणे-बेलापूर मार्गे नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा खाडीवर नवीन पुल बांधण्यात आला आहे. या पुलाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, या परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या पुलाची पोलीस कमिशनर ऑफिस ते कळवा चौक-बेलापूर रोड मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. कळवा खाडीवर एकूण तीन पुल आहेत. पहिला पुल ब्रिटिशकालीन असून तो १८६३ मध्ये बांधला होता. २०१० मध्ये त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद झाली. ऑगस्ट २०१६ मध्ये सदर पुल वाहनांसाठी बंद करण्यात आला. तो आता वास्तू वारसा (हेरिटेज साईट) आहे. १९९५-९६ दरम्यान दुसरा कळवा खाडी पूल बांधण्यात आला. त्यावरुनच आतापर्यंत सर्व वाहतूक सुरु होती. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दोन्हीकडील चौकात वाहतूक कोंडी होत होती. म्हणून सदरचा तिसरा पुल बांधण्यात आला आहे. तिसरा पुल २०१३ मध्ये प्रस्तावित करण्यात आला. नवीन पुलाची एकूण लांबी २.२० कि.मी. असून पुलाकरिता एकूण ५ मार्गिका बांधण्यात आलेल्या आहेत. या पूलाचा एकूण प्रकल्प खर्च १८3.६६ कोटी इतका आहे.
ठाणे कारागृह जवळील मार्गिका डिसेंबर पासून वाहतुकीस खुलीः
उर्वरित साकेत कडील मार्गिका मार्च २०२३ पर्यंत वाहतुकीस पूर्ण तयार होऊन संपूर्ण पुल वाहतुकीस उपलब्ध होईल. संपूर्ण पूल वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यानंतर कळवा, मुंब्रा आणि बेलापूर कडे जाणारी संपूर्ण वाहतूक पुलावरुन एकेरी मार्गाने जाईल. बेलापूर रोड कळवा, मुंब्रा कडून ठाणे शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे सध्या वापरात असलेल्या पुलावरुन एकेरी मार्गाने असेल. पुलावर येण्यासाठी पोलीस कमिशनर ऑफिस, जेल जवळ आणि साकेत कडून येणाऱ्या वाहनांकरिता वर्तुळाकार अशा तीन मार्गिका आहेत. पुलावरुन उतरण्यासाठी कळवा चौक आणि बेलापूर रोड अशा दोन मार्गिका आहेत.