कोपरखैरणे ते आळंदी पायी दिंडीचे प्रस्थान
नवी मुंबई :ज्ञानोबा माऊलीच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात शुक्रवारी कोपरखैरणे ते अलंकापुरी आळंदी अशी दिंडी प्रस्थान झाली.श्री विठ्ठल रखुमाई वारकरी सेवा मंडळ नवी मुंबई यांच्या माध्यमातुन वै. ह.भ.प आदितवार म्हात्रे महाराज यांनी १९६२ साली कोपरखैरणे ते आळंदी या पायी दिंडी यात्रा सुरु केल्याला यंदा ६० वें वर्ष आहे.
नवी मुंबई शहर हे आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र हे शहर येथील भूमिपुत्रांच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभे राहिले आहे. शेतकरी आणि पांडुरंगाचे अतूट नाते हे साऱ्या देशाला परिचित आहे. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात देखील वरीची परंपरा टिकून आहे आणि त्याच धर्तीवर नवी मुंबईतून आळंदी - पंढरपूर दिंड्या निघतात. यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई वारकरी सेवा मंडळ नवी मुंबई यांच्या माध्यमातून कोपरखैरणे ते अलंकापुरी आळंदी करिता ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली चा जयघोष करीत शनिवारी दिंडी प्रस्थान झाली. या दिंडीचे नवी मुंबईतील गावा गावात मनोभावे स्वागत करण्यात येते. कोपरी गावात देखील ही दिंडी आली असता ग्रामस्थानी दिंडीचे स्वागत केले. वै. ह.भ.प आदितवार म्हात्रे महाराज यांनी १९६२ साली कोपरखैरणे ते आळंदी ही पायी दिंडी यात्रा सुरु केल्याला यंदा ६० वें वर्ष आहे. सद्यस्थितीत या दिंडीची धुरा त्यांचे सुपुत्र ह.भ.प.सोपानदेव महाराज सांभाळत असून दिंडी सोबत नवी मुंबईतील शेकडो वारकरी सहभाग घेत चालत जातात.