१२५०० नाट्यप्रयोगांचे विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांचा विशेष सन्मान

नवी मुंबई ः आपल्या ३९ वर्षांच्या रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीत १२,५०० प्रयोगांचा टप्पा पार करण्याचा अनोखा विक्रम करणारे सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांचा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर आणि क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या शुभहस्ते शाल, पुणेरी पगडी आणि सन्मानचिन्ह प्रदान करुन विशेष सन्मान क़रण्यात आला. एका लग्नाची पुढची गोष्ट या हाऊसफुल्ल नाट्यप्रयोगाप्रसंगी संपन्न झालेल्या या गौरवावेळी नाटकातील सहकलावंत कविता मेढेकर, अतुल तोडणकर, पूर्वा भिडे, अतुल तोडणकर, राजसी चिटणीस, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांनाही सन्मानित करण्यात आले.

मराठी नाटकांवर भरभरुन प्रेम करणारी रसिक माणसे ऊर्जा असून गेल्या ३९ वर्षात १२,५०० प्रयोग करु शकलो ते उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार लाभले म्हणूनच.  रसिकांचा कायम आशिर्वाद लाभला हेच या विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक असल्याचे अभिनेते प्रशांत दामले यांनी विष्णुदास भावे नाट्यगृहातील सदर विशेष सत्कारावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात ५२ ठिकाणी नाट्यप्रयोग होऊ शकतात. त्यामध्ये नवी मुंबई महापालिकेचे विष्णुदास भावे नाट्यगृह स्वच्छता आणि सुविधांच्या दृष्टीने टॉप फाईव्हमध्ये असून त्यासाठी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियमित जागरुकतेबद्दल  प्रशांत दामले यांनी गौरवोद्‌गार काढले. विष्णुदास भावे नाट्यगृह उत्तम आहेच; त्यासोबतच नाटक कसे बघायचे ते उत्तमरित्या कळणारे नाट्यरसिक इथे आहेत, असा विशेष उल्लेखही त्यांनी केला.

 १९८३ साली टुरटूर या नाटकापासून आपल्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या प्रशांत दामले यांनी आपल्या ३९ वर्षांच्या नाट्यकारकिर्दीत १२,५०० हून अधिक नाट्यप्रयोग केले. या विक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या कारकिर्दीचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे १२,५०० व्या प्रयोगाप्रसंगी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव करण्यात आला. सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लॉगवरुन मराठी रसिकांना नाटकांवर प्रेम करायला लावण्यात प्रशांत दामले यांचे मोठे योगदान असल्याचे लिहीत प्रशांत दामले यांच्या कामाचा मी चाहता असल्याचे मत व्यक्त केले.

रंगभूमीवरील सदर विक्रमी वाटचालीबद्दल नवी मुंबई महापालिकेनेही १२,५०३ व्या प्रयोगावेळी विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष सन्मान करीत प्रशांत दामले यांचे समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत त्यांच्या आगामी कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निरसूख हॉटेलला बार आणि रेस्टारंटला दिलेला परवाना रद्द करण्याची मागणी