उलवे व विमानतळ परिसरातील सिडकोच्या जागेवर बेकायदेशीररीत्या डेब्रिज

सिडकोच्या जागेवर डेब्रिज टाकणा-या व्यक्तीकडुन सिडकोच्या अधिका-यांची अडवणुक
 

नवी मुंबई : विमानतळ परिसरातील सिडकोच्या जागेवर बेकायदेशीररीत्या डेब्रिज टाकणा-या व्यक्तीला अडविण्यासाठी गेलेल्या सिडकोच्या अधिकाऱयांनाच डेब्रिज टाकणा-या व्यक्तीने शिवीगाळ करुन तसेच धमकावुन त्यांना तेथून जाण्यास प्रतिबंध केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उलवे परिसरात घडला. अलंकार ठाकुर असे या व्यक्तीचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

उलवे व विमानतळ परिसातील सिडकोच्या जागेवर काही व्यक्तींकडुन बेकायदेशीररीत्या डेब्रिज व घनकचरा टाकण्यात येत असल्याने सिडकोने अशा व्यक्तींवर लक्ष ठेवुन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. या महिन्याभरामध्ये सिडकोने डेब्रिज टाकणा-या दोन डंपर चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. उलवे सेक्टर-26 भागात राहणारा अलंकार ठाकुर हा देखील विमानतळ परिसरात मागील काही महिन्यांपासुन बेकायदेशीररीत्या डेब्रिज टाकत आहे.

त्यामुळे गत डिसेंबर महिन्यामध्ये सिडकोतील सहाय्यक कार्यकारी अभियंता वैभव शास्रकार, सहाय्यक अभियंता स्वप्नील नितनवरे यांनी अलंकार ठाकुर याला सिडकोच्या जागेवर डेब्रिज न टाकण्याबाबत समज दिली होती. त्यावेळी अलंकार ठाकुर याने सदर जागा त्याच्या मालकीची असल्याचे सांगत सिडकोच्या अधिकारी आणि सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली होती. मात्र नंतर त्याने यापुढे डेब्रीज टाकणार नसल्याचे सिडकोच्या अधिका-यांना सांगितले होते.

मात्र त्याने पुन्हा त्या भागात डेब्रिज टाकण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी दुपारी अलंकार ठाकुर याचा डंपर चालक त्या भागात घनकचरा टाकण्यासाठी गेला होता. यावेळी त्याठिकाणी तैनात असलेला सुरक्षारक्षक त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत सदर डंपर चालक शंकर मंदिराच्या पाठीमागील जागेत घनकचरा टाकुन तेथून पळुन गेला होता. याबाबतची माहिती सुरक्षारक्षकांनी आपल्या अधिका-यांना दिल्यांनतर सिडकोतील अभियंते शास्रकार व नितनवरे हे घटनास्थळी आपल्या आर्टीका कारने पोहोचले.

काही वेळानंतर त्याठिकाणी अलंकार ठाकुर हा देखील त्याच्या अर्टीका कारमधुन आला असता, सिडकोच्या अधिकाऱयांनी त्याला डेब्रिज का टाकले याची विचारणा केली. त्यामुळे अलंकार ठाकुर याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच सदरची जागा त्याची असल्याने डेब्रीज त्याचठिकाणी टाकणार असल्याचे त्याने सगळ्यांना बजावले. त्यामुळे सिडकोच्या अधिका-यांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते आपल्या कारमधुन जाण्यासाठी निघाले असताना अलंकार ठाकुर याने त्याची अर्टीका कार सिडको अधिका-यांच्या कारला अडवी लावुन त्यांना त्याठिकाणावरून जाण्यास प्रतिबंध केला. त्यानंतर त्याने बराचवेळ सिडकोच्या अधिका-यांसोबत हुज्जत घातली. त्यानंतर सिडकोच्या अधिका-यांनी कसेबसे त्या ठिकाणावरुन सुटका करुन घेत एनआरआय पोलीस ठाणे गाठुन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

“लोकनेते रामशेठ ठाकूर ‘रयत’च्या पाठिशी खंबीर” - अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार