पोलीस ठाण्याची इमारत उद्‌घाटनाअगोदरच भग्नावस्थेत ​​​​​​​

मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची नागरिकांना प्रतिक्षा

उरण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ८५ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्‌घाटना अगोदरच भंगारात निघाली असून सध्या या इमारतीला झाडा-झुडपांचा विळखा पडला आहे. त्यामुळे शासनाकडून खर्च करण्यात आलेला ८५ लाखांचा निधी वाया जातो की काय? असा प्रश्न उरणकरांना पडला आहे.

सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किनारपट्टी वरील सागरी पोलीस ठाण्यांना विशेष महत्त्व प्राप्त करुन दिले आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा, करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे. मोरा सागरी पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी, यासाठी  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शन पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या ८५ लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम २०१८ ते २०२० या वर्षात हाती घेतले आहे.

परंतु, सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. त्यात शहरात उद्‌भवणाऱ्या पावसाळ्यात पूरजन्य परिस्थितामुळे पाणी सदर इमारतीच्या तळमजल्यावर साचून राहते. एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उद्‌घाटनाअगोदरच सदर इमारत भग्नावस्थेत पडून राहिली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा पैसा वाया जातो की काय? अशी चर्चा सध्या उरणात रंगू लागली आहे.

राज्य शासनाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी ८५ लाखांचा निधी २०१८ मध्ये मंजूर करुन दिला. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे सदर इमारतीचे काम अर्धवट स्थितीत आजतागायत पडून राहिले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.  -जयवंत कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा-उरण.

उरण येथील मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम रेंगाळत पडले आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर इमारतीचे काम पूर्ण व्हावे अशी पोलीस यंत्रणेची मागणी आहे. - दिपक इंगोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - मोरा सागरी पोलीस ठाणे.

मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम निधी अभावी रेंगाळत पडलेले आहे. शासनाकडून उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाला तर उर्वरित काम लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. - नरेश पवार, उपअभियंता - सार्वजनिक बांधकाम विभाग, उरण. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करावे गावात ३५ सीसीटिव्ही कॅमेरे