पामबीच मार्गावर बेकायदा वाहन पार्किंग?

रस्ता मोकळा श्वास कधी घेणार? - वाहन चालकांचा प्रश्न

वाशी : कोपरी गाव, पामबीच मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग' आहे. मात्र, ‘नो पार्किंग' क्षेत्र असून देखील कोपरी गाव, पामबीच मार्गावर वाहन विक्रेत्यांकडून दुहेरी रांगेत विक्रीसाठी वाहने उभी केली जात आहेत. सदर वाहन पार्किंगमुळे पामबीच रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सदर रस्ता मोकळा श्वास कधी घेणार?, असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र, नवी मुंबई शहरात वाढती वाहन संख्या चिंतेची बाब बनली असून, वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी मध्ये भर पडत चालली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून वाहतूक पोलीस विभाग आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी ‘नो पार्किंग झोन' तयार करण्यात आले आहेत. मात्र, पामबीच मार्गावर ‘नो पार्किंग झोन'चे फलक फक्त शोभेसाठी लावले आहेत का?, असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. पामबीच मार्गावर ‘नो पार्किंग क्षेत्र' असून, देखील वाहन विक्रेत्यांकडून या ठिकाणी विक्रीसाठी दुहेरी रांगेत वाहने उभी केली जात आहेत. मात्र, वाहन पार्किंगमुळे कोपरी गाव, पामबीच रस्त्यावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. कोपरी गाव, पामबीच मार्गावरील ‘नो पार्किंग क्षेत्र' मध्ये पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा दावा एपीएमसी वाहतूक पोलीस शाखेकडून नेहमीच केला जातो. मात्र, येथील वाहन पार्किंगमुळे सदर कारवाई फक्त दिखाव्याची ठरत आहे. त्यामुळे कोपरी गाव, पामबीच रस्ता कायमस्वरुपी मोकळा ठेवण्यासाठी वाहतूक विभाग कधी प्रयत्न करणार?, असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत आहेत.

पामबीच मार्गावरील नो पार्किंग झोन मधील पार्क वाहनांवर वाहतूक पोलीस विभागामार्फत नित्याने कारवाई सुरु आहे. तसेच येथील वाहन विक्रेत्यांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. - तिरुपती काकडे, उपायुक्त - वाहतूक शाखा, नवी मुंबई पोलीस आयुवतालय. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

केंद्र सरकार कडून केवळ नामकरणाची औपचारिकता बाकी