केंद्र सरकार कडून केवळ नामकरणाची औपचारिकता बाकी

दिघा गांव रेल्वे स्थानक नावावर राज्य सरकारचे शिक्कामोर्तब

नवी मुंबई : ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गांव असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या गृह (मोटार) विभागाच्या सह-सचिवांनी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय गृह विभागाला पत्र पाठवून या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

 आता केंद्र सरकार कडून केवळ नामकरणाची औपचारिकता बाकी आहे. दिघा येथील लाखो रहिवाशांसाठी या स्थानकाच्या नामकरणाचा विषय त्यांच्या अस्मितेचा विषय होता. त्यामुळे या स्थानकाचे दिघा स्थानक असे नामकरण झाल्याचे समजताच येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी २०१२ मध्ये दिघा स्थानक निर्मितीची मागणी केली होती. त्यांनी खैरणे बोनकोडे आणि दिघा अशी दोन स्थानके निर्मिती करण्याची मागणी मंजूर करुन घेतली होती. यानंतर झालेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानुसार दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. २०२३ मध्ये स्थानकाचे काम पूर्णत्वास गेले. त्यापैकी दिघा स्थानकाला चालना मिळून ते स्थानक प्रत्यक्षात उतरले आहे.

ज्या परिसरामध्ये रेल्वे स्थानक निर्माण झाले आहे. त्या परिसरातील सर्व नागरिकांची या रेल्वे स्थानकाला दिघा स्थानक नामकरण करण्याची मागणी होती. यासंदर्भात दिघा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी दिघा रेल्वे स्थानक नामकरणासाठी लेखी निवेदने दिली होती. रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचे नाव मार्च २०२३ रोजीच्या नोटिफिकेशनने दिघा ऐवजी दिघे असे ठेवले होते. वास्तविक नवी मुंबईतील दिघा येथील प्रभाग रचना , निवडणूक आयुक्तांच्या नोंदीनुसार दिघा असेच नाव आहे. परंतु, काही घटकांनी दिघावासीयांची स्थानिक अस्मिता डावलून महसूल विभागाच्या जुन्या नोंदीचा दाखला देत दिघाऐवजी दिघे स्थानक नामकरण करण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात दिघावासियांच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण होऊन नागरिक आंदोलनाच्या तयारीत होते. अखेर आ. गणेश नाईक यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदरचा विषय उपस्थित करुन राज्य सरकारने दिघा रेल्वे स्थानक नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करुन अंतिम मंजुरीसाठी तो केंद्रीय गृह विभाग, रेल्वे प्रशासन, रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदरचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभाग अंतर्गत परिवहन खात्यामधून मंजूर होऊन तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय गृह विभाग येथे पाठवण्यात आला आहे.  त्यामुळे या स्थानकाचे नामकरण दिघा गाव रेल्वे स्थानक असे झालेले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुशाफिरी : कौटुंबिक पर्यावरण निकोप हवे !