महापालिकेच्या २ उद्यानांच्या नामफलकाची दुरावस्था दूर करण्याची मागणी

माजी नगरसेविका सौ. सुजाता पाटील आयुवत नार्वेकर यांना निवेदन

नवी मुंबई : नेरुळ, सेक्टर-६ मधील महापालिकेच्या दोन उद्यानांच्या नामफलकाची दुरावस्था दूर करण्याची मागणी प्रभाग क्र.८५ च्या माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

नेरुळ, सेक्टर-६ परिसरातील सिडको वसाहतीमध्ये राजमाता जिजाऊ उद्यान आणि सीव्ह्यू नेरूळ उद्यान अशी महापालिकेची दोन उद्याने आहेत. वरुणा सोसायटी लगत राजमाता जिजाऊ उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील नामफलकातील राजमाता जिजाऊ उद्यानातील अक्षरे गळून पडली आहे. महापालिका प्रशासनाने इतिहासात आदरणीय स्थान असलेल्या महापुरुषांची, थोर सेनानींनीची नावे एकतर वास्तुला देवू नयेत, नावे दिली तर त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या शिवछत्रपतींच्या मातोश्रींचे नाव उद्यानाला दिले आहे. उद्यानाच्या नामफलकावरील नावे गळून पडली तरी नामफलकाची डागडुजी करण्याचे तसेच दुरुस्ती करुन दुरावस्था तात्काळ दूर करण्याचे सौजन्यही महापालिका प्रशासनाकडून दाखविले जात नाही. सदर बाब खरोखरीच खेदाची असल्याचे सौ. सुजाता पाटील यांनी आयुवतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सुश्रुषा रुग्णालयानजिक नेरूळ सीव्ह्यू सोसायटीलगत सीव्ह्यू नेरुळ उद्यान आहे. या उद्यानाच्या नामफलकावरील अक्षरेही गळून पडली असल्याने उद्यानाच्या नामफलकाला दुरावस्था प्राप्त झाली आहे. ‘स्वच्छता अभियान'मध्ये केवळ संरक्षक भिंतींची रंगरंगोटी नवी मुंबईकरांना अपेक्षित नसून उद्यान-क्रीडांगणाचे सुशोभिकरण आणि सुविधांची मुबलकता अपेक्षित आहे. त्यामुळे सदर दोन्ही उद्यानातील नामफलक बदलून त्याजागी नवीन नामफलक तातडीने बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सौ. सुजाता पाटील यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पामबीच मार्गावर बेकायदा वाहन पार्किंग?