मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेस पणन खाते द्वारे अधिकृत परवानगी

बिगर परवानाधारकांना एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील  कचरा उचलण्यास मनाई

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये रोज निघणारा टाकाऊ भाजीपाल्याचा ओला, सुका कचरा आणि पालापाचोळा आता भाजीपाला मार्केटआवाराबाहेर घेवून जाण्यास मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था मर्यादित, नवी मुंबई  यांना राज्य सहकार आणि पणन खात्याने अधिकृत परवानगी दिली आहे. तसेच बिगर परवानाधारक घटकांवर नियंत्रण ठेवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक बेकायदेशीर घटक कोणताही परवाना अथवा परवानगी नसताना एपीएमसी भाजीपाला आवारातील टाकाऊ भाजीपाला घेऊन जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने अनेक तक्रारी एपीएमसी पोलीस ठाणे मध्ये दाखल झालेल्या आहेत. याबाबत राजाराम टोके यांनी पणन खात्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने शासनाकडे वेळोवेळी तक्रार दाखल केल्या आहेत. तर मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था, नवी मुंबई यांना एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील टाकाऊ भाजीपाला जनावरांच्या खाद्य करिता घेऊन जाण्याची बाजार समितीने ना हरकत दर्शवली असून, सदर संस्थेला परवानगी असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील उपविधी १५ नुसार मे. शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्था मर्यादित, या संस्थेला मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती मधील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला संकुल बाजार आवारातील टाकाऊ भाजीपाल्याचा ओला, सुका कचरा आणि पालापाचोळा आवाराबाहेर घेवून जाण्यास राज्य सहकार आणि पणन खात्याने ३० ऑगस्ट २०२३ रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, प्रशासनाने अन्य सर्व बिगर परवानाधारक संस्थेस आणि घटकांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर बंदी आणून उचित कार्यवाही करावी तसेच या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर प्रतिबंधित घटकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याबाबत सचिव, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश देखील पणन खात्याने निर्गमित केले आहेत. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजार आवारातील कचरा उचलणाऱ्या बिगर परवाना धारकांना आता चाप बसणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या २ उद्यानांच्या नामफलकाची दुरावस्था दूर करण्याची मागणी