महापालिकेच्या भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ

पनवेल महानगरपालिकेची ३७७ पदांची भरती प्रक्रिया सुरू

पनवेल: पनवेल महापालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी शुध्दीपत्रकाद्वारे गट'अ' ते गट 'ड' मधील ३७७ रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यांसाठी दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. आतापर्यंत सुमारे 98 हजार उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केले आहे.

ही भरती प्रक्रिया पारदर्शी होणार आहे. यामध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा इत्यादी विभागांतील पदांकरिता ही भरती होणार आहे. तुलनात्मक स्पर्धेतून निवड प्रक्रिया होण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना www.panvelcorporation.comhttps://mahadma.maharashtra.gov.inhttps://mahadma. या संकेतस्थळांवर 15 सप्टेंबरपर्यंत रात्री ११:५५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेल व एसएमएसव्दारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेची भरती प्रक्रिया संबंधात उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पालिकेने तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. उमेदवारांना भरती प्रक्रिया संदर्भात काही अडचण असल्यास ०२२-२७४५८०४२, २७४५८०४१ या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा असे आवाहन मुख्यालय उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संर्वर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 पनवेल महानगरपालिकेची ३७७ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. सदर भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार असून,कृपया नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना किंवा प्रलोभनांना बळी पडू नये. भरती प्रक्रिये संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्याने ,पदाधिका-याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखविल्यास याबाबत त्यांचे विरुद्ध पुराव्यासह नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दाखल करावी . परीक्षेच्या बाबतीत कोणतीही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. - गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 प्रदूषणकारी ६५ कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे कारवाई