इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा

शासन निर्देशानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

नवी मुंबई  : यावर्षी गणेशोत्सव १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात होत असून २८ सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव तसेच १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.  सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १७ मे २०२३ रोजीच्या बैठकीतील निर्देश आणि गृह विभागाकडून मागील वर्षी ८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकानुसार पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. न्यायालयाने र्निगमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजपणा नसावा, असे आयुवत राजेश नार्वेकर यांनी सूचित केले आहे.

सर्व गणेशभक्त, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांनी शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून घडविलेल्या श्री गणेशमूर्तींची विक्री अथवा खरेदी करु नये. पीओपी मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. पारंपारिक गणेशमुर्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदि मुर्तींचे पुजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन अथवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषण संदर्भातील नियमांचे आणि तरतुदींचे पालन करण्यात यावे.

महाराष्ट्र शासन तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच शासन परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजुन काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्यात यावे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने अवलंबिण्याच्या परवानगी प्रक्रियेबाबत सर्व विभाग कार्यालय स्तरावर बैठका आयोजित करण्यात येणार असून त्यास उपस्थित राहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घ्यावयाची आहे, असे निर्देश आयुवत नार्वेकर यांनी दिले आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोर अंमलबजावणी तसेच रस्ता, पदपथ आणि पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप, तत्सम रचना उभारणे संदर्भात उच्च न्यायालयाने  दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणे  परवानगी देण्याची ‘ई-सेवा संगणक प्रणाली' नवी मुंबई महापालिकेने विकसित केली आहे. सर्व गणेशोत्सव, नवरात्रौत्सव मंडळे आणि नागरिक यांनी महापालिकेच्या www.rtsnmmconline.com या वेबसाईट (Website) वर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करण्यास गणेशोत्सवापूर्वी एक महिना आधी १९ ऑगस्ट पासून कार्यालयीन वेळेमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. मंडप उभारणी करता कोणतेही शुल्क अथवा अनामत रक्कम आकारण्यात येणार नाही. नवरात्रौत्सवासाठीही याच वेबसाईटवर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. दोन्ही उत्सवाच्या १० दिवस अगोदर ऑनलाईन प्रणालीद्वारे परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे, याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावयाची आहे.

गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये. तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरु नये. परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नयेे. हद्दीतील कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व मंडप उभारणी परवानगी अर्ज विहित कालावधीमध्ये महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे वेबसाईटवर ऑनलाईन (ध्हत्ग्हा) सादर करावेत. -राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

साहित्य विचारधारा काव्य स्पर्धेत नवी मुंबईकर अनिल काकडे यांना तृतीय पुरस्कार