महापालिकेच्या उपाय योजनांवर पाणी?

तीन महिन्यांनंतर वायू प्रदूषण; पुन्हा एकदा काेंडला नागरिकांचा श्वास?

वाशी : मागील तीन महिने उसंत घेतलेल्या ठाणे-बेलापूर पट्टीतील एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून २९ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा एकदा वायू प्रदूषण करण्यात आले. या वायू प्रदूषणामुळे वातावरणात धुके पसरुन उग्र दर्प वास सुटला होता. त्यामुळे रात्री महापे ते कोपरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले  होते.

नवी मुंबई शहराच्या पूर्वेला विस्तीर्ण एमआयडीसी असून, या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. मात्र, सदर कारखानदारांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम खुंटीला टांगून वारंवार वायू प्रदूषण तसेच जल प्रदूषण केले जात आहे. या प्रदूषणामुळे शहरी भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रासायनिक कारखान्यांतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रकिया न करताच रसायन मिश्रित पाणी नाल्यात सोडले जाते. तसेच मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू देखील हवेत सोडला जातो. मात्र, वारंवार सोडण्यात येत असलेल्या वायू मुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन नागरिक भयभीत होत आहेत. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर रासायनिक कारखानदारांनी उसंत घेतली होती. मात्र, तीन महिन्यानंतर २९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा रात्री साडेबारा ते  दोन वाजण्याच्या दरम्यान महापे ते कोपरी या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले होते. या प्रदूषणाची तीव्रता इतकी होती की दहा ते बारा फुटावरील व्यक्ती दिसत नव्हती. तर प्रदूषित वायूच्या दर्प वासामुळे नागरिकांना मळमळ, श्वास घेण्यास त्रास झाला. एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषणाचे सत्र कायम आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सर्वसामान्य व्यक्ती तसेच आमदारांनी देखील तक्रारी करन विधानसभेत आवाज उठवला आहे. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे वैसे' आहे. त्यामुळे नवी मुंबई मध्ये देखील भोपाळ सारखी गॅस दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई मधील वायू प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्या रासायनिक कंपन्यांवर कारवाई करणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सुरु करावे. त्याचबरोबर तळोजा एमआयडीसी मधील कोणत्या कंपन्यांकडून रात्रीच्या वेळी उग्र दर्प असलेल्या वायूंचे उत्सर्जन केले जाते, याचा ‘एमपीसीबी'ने शोध घेऊन त्या कंपन्यांना वायू प्रदूषण नियंत्रक बसवण्याचे निर्देश द्यावेत. त्याशिवाय किती प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे, याबाबत पर्यावरण प्रधान सचिवांनी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करावे आणि तीन आठवड्यांत अहवाल द्यावा', असे विविध महत्त्वाचे निर्देश राज्याचे लोकायुक्त न्यायाधीश विद्यासागर कानडे गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिले आहेत. मात्र, आदेश असून देखील वायू प्रदूषण होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या उपाय योजनांवर पाणी?
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाची नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका द्वारे ‘नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा' तयार करण्यात आला असून, त्या अनुषंगाने कृतीशील पावले उचलण्यात येत आहेत. त्याकरिता विविध उपक्रम राबविले जात असून, पर्यावरणपूरक उपाययोजनांव्दारे हवा गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, रासायनिक कारखादारांकडून रात्री-अपरात्री वायू प्रदूषण केले जात असल्याने महापालिका करीत असलेल्या उपाय योजनांवर पाणी फेरले जात आहे.

एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून वायू प्रदूषणाचे सत्र कायम असून, त्याकडे तक्रारी करुन देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत आहे. सार्वजनिक सुट्टीच्या आदल्या रात्री वायू प्रदूषण केले जाते. त्यामुळे याबाबत आता शंका उपस्थित होत आहे. - संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई विकास प्रतिष्ठान.

एमआयडीसी मधील कारखानदारांकडून करण्यात येणाऱ्या वायू प्रदूषण विरोधात पाहणी करुन कारवाया केल्या आहेत. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या वायू प्रदूषणाची कर्मचाऱ्यांमार्फत पाहणी करुन उचित कार्यवाही केली जाणार आहे. - जयंत कदम, उप प्रादेशिक अधिकारी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा