श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त ठाणे जिल्ह्यातील मार्गदर्शक, खेळाडुंचा सत्कार

असेच खेळत राहा अन्‌ ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा - जिल्हाधिकारी शिनगारे

ठाणे : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाच्या अशा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त ठाणे जिल्ह्यातील मार्गदर्शक आणि खेळाडुंचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे शाल आणि सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ‘जिल्हा परिषद'च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने, तालुका क्रीडा अधिकारी रुही शिंगाडे आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाचे रंगनाथ डुकरे उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील खेळाडुंनी ठाणे जिल्ह्याचे नाव राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. त्याचा आम्हा सर्वांना तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही असेच खेळत राहा आणि ठाणे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा, यामुळे आमचाही उत्साह वाढेल, असे गौरवोद्‌गार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी काढले.

खेळाडू घडताना त्या खेळाडुच्या जिद्दीसोबत त्याच्या पालकांचा पाठिंबा आणि शासनाचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच खेळाडुंना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मी मानतो. ठाणे जिल्ह्यातील भावी खेळाडुंना शासकीय सुविधांची जोड मिळाल्यास आणखी प्रतिभावंत खेळाडू निर्माण होतील आणि यासाठी सर्व प्रकारची मदत जिल्हा प्रशासनाकडून निश्चित केली जाईल, असे जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले.

सदर सत्कार सोहळ्याची सुरुवात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन' निमित्त हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. सदर देखण्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले. सूत्रसंचालन संगीता धनुकटे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक मधुरा सिंहासने यांनी मानले.

सन्मानित मार्गदर्शक, खेळाडुंची नावेः
सन २०१९-२० जीवनगौरव पुरस्कार (बॅडमिंटन) श्रीकांत वाड
सन २०१९-२० क्रीडा मार्गदर्शक (कबड्डी) प्रशांत चव्हाण
खेळाडूः
सन २०१९-२० पॉवर लिपटींग- नाजुका घारे, शुटींग- भक्ती खामकर, कबड्डी- सायली जाधव (सध्या तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत)
सन २०२०-२१ कबड्डी- निलेश साळुंके, खो-खो- प्रियांका भोपी, टेबल टेनिस- सिध्देश पांडे
सन २०२१-२२ पॉवर लिपटींग- साहिल उतेकर
मैदानी खेळ- प्रणव देसाई 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या उपाय योजनांवर पाणी?