नवी मुंबई शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

नारळी पौर्णिमा निमित्त आगरी-कोळी समाजाच्या उत्साहाला उधाण

वाशी : ‘सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा' अशी गाणी म्हणत ढोल ताशा आणि बेंजो यांच्या तालावर थिरकत नवी मुंबई मधील आगरी-कोळी ग्रामस्थांनी दर्या राजाला नारळ अर्पण करत ‘नारळी पौर्णिमा' सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ‘नारळी पौर्णिमा' सण साजरा करताना आगरी-कोळ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

वर्षभर आपला उदर निर्वाह करणाऱ्या आणि सांभाळ करणाऱ्या दर्या राजाला नारळ अर्पण, पूजा करुन नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आगरी-कोळी ग्रामस्थांकडून साजरा केला जातो. नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांचा शेती आणि मच्छिमारी पारंपारिक व्यवसाय आहे. मात्र, नवीन शहर वसवण्यासाठी येथील शेतजमीन संपादित केल्याने येथील शेतकरी भूमिहीन झाले. परंतु, नवी मुंबई मधील खाडी शाबूत असल्याने मासेमारीचा व्यवसाय आजही सुरु आहे. मात्र, या व्यवसायाला येथील खाडीतील प्रदूषणाचा फटका बसत असल्याने मासळीचा दुष्काळ पडत असतो. परंतु, येथील आगरी-कोळी बांधव हार न मानता पुढच्या वर्षी ‘जाळ्याला म्हावरा सापडू दे', असे साकडे घालत नारळी पौर्णिमा दिनी दर्याराजाची यथासांग पूजा करुन नारळ अर्पण करतात. त्याच पाश्वर्भूमीवर ३० ऑगस्ट रोजी नवी मुंबई शहरातील खाडीकिनारी मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

यंदाही सारसोळे कोळीवाड्यात पारंपारिक नृत्याच्या अविष्कारामध्ये नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यात लहान-सहान मुलांपासून ते अगदी जेष्ठ नागरीक आपल्या पारंपरिक आगरी-कोळी वेशात पालखी नाचवत दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी आले होते. त्यामुळे नारळी पौर्णिमा सण साजरा करताना आगरी-कोळ्यांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.

यावेळी पालखी सोहळ्यामध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, माजी नगरसेवक सुरज पाटील, रुपाली भगत, माजी नगरसेविका सुजाताताई सुरज पाटील, गणेश भगत ,नामदेव भगत, रतन मांडवे, मनोज मेहेर आदी सहभागी झाले होते.

दर्याराजाला नारळ अर्पण
वर्षभर आपला उदर निर्वाह आणि सांभाळ करणाऱ्या दर्या राजाला नारळी पौर्णिमा दिनी नारळ देऊन पूजा केली जाते. या दिवशी सर्व आगरी-कोळी बांधव आपल्या होड्यांची विधिवत पूजा करतात. त्यानंतर मासेमारी करण्यासाठी होड्या समुद्रात सोडतात. तर दर्याराजाने  आपल्या सौभाग्याचे रक्षण करावे म्हणून महिला वर्ग साकडे घालतात. या दिवशी घरात गोडधोड नैवद्य केला जातो. त्यात पुरण पोळी, करंजी यांचा मुख्य समावेेेश असतो.

नारळी पौर्णिमा उत्साहाचा सण जरी असला तरी रासायनिक प्रदूषणामुळे नवी मुंबई मधील खाडीत मासळीचे दुर्भिक्ष्य पडले आहे. त्यामुळे ज्या दिवशी नवी मुंबईतील खाडीतील प्रदूषण कमी होईल त्या दिवशी खरी नारळी पौर्णिमा साजरी होणार आहे. त्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी खाडीतील प्रदूषण विरोधात सातत्याने आवाज उठवण्याची गरज आहे. - मनोज मेहेर, अध्यक्ष - कोलवाणी मित्र मंडळ, सारसोळे कोळीवाडा.

समुद्राकाठी राहणाऱ्या आणि प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा म्हणजे महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत व्हावा, यासाठी कोळी बांधव नारळी पौर्णिमा दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करतात. - नामदेव भगत, अध्यक्ष - नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस.

नवी मुंबई शहराला सांस्कृतिक वारसा आहे. त्यामुळे आजही नवी मुंबई शहरातील गावागावात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने साजरे केले जातात. त्याच पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी होत आहे. त्यामुळे येथील मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी बांधवांच्या जाळ्यात भरपूर मासळी पडूदे आणि इथला समाज अधिक सुखी, समृध्द होऊदे हीच दर्यादेवाला प्रार्थना. - सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार - बेलापूर विधानसभा मतदारसंघ. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त ठाणे जिल्ह्यातील मार्गदर्शक, खेळाडुंचा सत्कार