‘उरण'चे रस्ते बनले डम्पिंग ग्राऊंड

‘स्वच्छ भारत अभियान'चे ग्रामपंचायतींनी वाजवले तीनतेरा

उरण : ‘स्वच्छ भारत अभियान'चे उरण मधील ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राऊंडे केल्याचे चित्र उरण तालुक्यात पहावयास मिळत आहे. अशा  कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर प्रकाराची दखल घेऊन ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि ‘उरण पंचायत समिती'चे गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडीत सदर प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उरणकर नागरिकांकडून करण्यात आली आहे.

अरबी समुद्राच्या कुशीत वसलेला आणि निसर्ग संपन्न डोंगर रांगांच्या गर्द हिरव्या छायेत बसलेला उरण तालुका मुंबई आणि नवी मुंबई शहरांचा श्वास म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र, उरण तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला गेला असून त्यांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकंदरीत शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करत असताना गावातील ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेचे तीनतेरा वाजवित असून ते जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. तसेच ग्रामस्वच्छतेसाठी आग्रही असणारे महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासन सुध्दा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि ‘उरण पंचायत समिती'चे गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांचे सदर प्रश्नांकडे लक्ष वेधतानाचा त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी उरणकर नागरिकांनी केली आहे.

चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड रस्त्यावरुन दररोज  हजारो लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. उन्हाळ्यात काही प्रमाणात कचरा जाळला जात होता. त्यामुळे दुर्गंधी येत नव्हती. परंतु, पावसामध्ये  रस्त्यावर टाकलेल्या कचरा कुजून दुर्गंधी येऊ लागली आहे. या रस्त्यावरुन मार्गक्रमण करताना कचरा टाकलेल्या जागेवर आल्यावर नाक मुठीत धरावे लागत आहे. परिसरात रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. - मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना हक्काचे डम्पिंग ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राऊंडसाठी तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत लवकरच लवकर बैठक घेण्याचा तसेच या अगोदर कुठल्या प्रकारे डम्पिंग ग्राऊंड साठी पत्रव्यवहार केला आहे, याची माहिती घेणार आहोत. सदर प्रश्न जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने यावर लवकरच उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. - एस. पी. वाठारकर, गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी