नवी मुंबईतील लोकसेवा कार्यप्रणालीची ‘आसाम'च्या अभ्यासगटाकडून पाहणी

लोकसेवांच्या विहित कालावधीतील कार्यप्रणालीबद्दल अभ्यासगटाकडून प्रशंसा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या लोकसेवा प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा-कार्मिक विभागाच्या अभ्यास गटाने नुकतीच नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या ५१ लोकसेवांच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच वाशी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन लोकसेवा वितरण कार्यवाहीची प्रत्यक्ष पाहणी केली.

या अभ्यास दौऱ्याप्रसंगी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा-कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव पांचाली ककाती, उपसचिव मिताली लाहकर यांच्या समवेत ‘राज्य सेवा हक्क आयोग'चे कोकण विभागीय आयुक्त बलदेव सिंह आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी महापालिकेमार्फत राबविण्यात येणारी लोकसेवा वितरण कार्यवाहीची पध्दती बारकाईने जाणून घेत पुरविल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करावी, अशा सूचना दिल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सद्यस्थितीत शासन निर्देशानुसार ५१ लोकसेवा पुरविल्या जात असून त्यापैकी २८ लोकसेवा ऑनलाईन पुरविल्या जात आहेत. ‘आसाम'च्या अतिरिक्त सचिव पांचाली ककाती, उपसचिव मिताली लाहकर यांनी लोकसेवा वितरणाची कार्यवाही जाणून घेताना त्याविषयी प्रत्यक्ष वितरण कार्यप्रणाली पाहण्यासाठी वाशी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राला भेट दिली.

सदर ठिकाणी लोकसेवांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी अभ्यासगटाने संवाद साधला. त्याचप्रमाणे रांगेत उपस्थित असलेल्या अमित तिवारी यांच्या श्रेया नामक मुलीचे जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्यापासून प्रमाणपत्र घेण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही बघितली. यावेळी ‘राज्य सेवा हक्क आयोग'चे कोकण विभागीय आयुक्त बलदेव सिंह यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत लोकसेवा लाभार्थी अमित तिवारी यांना मुलीचे जन्म प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ यांच्या उपस्थितीत वाशी विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मिताली संचेती यांनी ‘आसाम'च्या अतिरिक्त सचिव पांचाली ककाती, उपसचिव मिताली लाहकर यांना लोकसेवांबाबतच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, नवी मुंबई महापालिका राबवित असलेल्या लोकसेवांबाबत विहित कालावधीतील कार्यप्रणालीबद्दल ‘आसाम'च्या अभ्यासगटाकडून प्रशंसा करण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नारळी पौर्णिमा सणासाठी सजल्या होड्या