नारळी पौर्णिमा सणासाठी सजल्या होड्या

आगरी-कोळी बांधवांचा उत्साह शिगेला

वाशी : वर्षभर समुद्रात लाटांचा सामना करत कोळी बांधव आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे समुद्राला श्रावण पौर्णिमा दिनी नारळ  अर्पण करुन कोळी समाजाकडून समुद्राच्या उपकाराचे आभार मानले जातात. या दिवसाची वर्षभर वाट पाहिली जाते. यंदा देखील या सणानिमित्त नवी मुंबई शहरातील कोळीवाडे सज्ज असून, होड्या सजल्या आहेत. 

आज साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमा सणानिमित्त नवी मुंबई शहरातील ऐरोली, बोनकोडे, दिवा, वाशी, सारसोळे, घणसोली, बेलापूर मधील दिवाळे येथील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची लगबग पाहायला मिळत आहे. नारळी पौर्णिमेला आगरी-कोळी महिलांसह बच्चे कंपनी घराघरांमध्ये सजावट करतात. कोळी किनारी नांगरुन ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात. होड्या सजवतात. नैवद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक तयार करतात. एकूणच कोळीवाड्यातील उत्साह शिगेला पोहोचतो. काही ठिकाणी भव्यदिव्य मिरवणुका काढण्यात येतात. दर्याराजाला नारळ अर्पण करुन ‘मासळीचा दुष्काळ सरु दे, दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे', अशी मागणी करतात. त्यानंतर ‘सण आयलाय गो आयलाय गो, नारळी पूनवेचा' अशी गाणी गात समुद्र किनाऱ्यावर नाच करत आनंदोत्सव साजरा केला जातो. सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलून सागरप्रवासाचा मुहूर्त केला जातो. यंदा देखील नारळी पौर्णिमा निमित्त कोळीवाडे सजले असून, होड्या पाण्यात सोडण्यासाठी तयार आहेत.

‘नारळी पौर्णिमा'चे महत्व
संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतात. त्यावेळी कोळी महिलांची मदार सागरदेवावर असते. त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने नारळी पौर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमा निमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंज्या (पूर्ण्या) यांचा नैवद्य बोटीला आणि समुद्राला दाखवतात. समुद्राची यशासांग पूजा करतात. ‘खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे, असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात.

समाज माध्यमांवर ‘रिल्स'ची धूम
यंदा आज ३० ऑगस्ट रोजीला नारळी पौर्णिमा आहे. मात्र, या सणाची खरी लगबग समाज माध्यमांवर पंधरा दिवस आधीच पाहवयास मिळत आहे. आगरी कोळी महिला, तरुणींनी  आगामी नारळी पौर्णिमा सणाला अनुसरुन कोळी गाण्याचा ठेका धरत मोठ्या  प्रमाणात फोटो, व्हिडिओ रिल्स  प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर या रिल्सची धूम पाहवयास मिळत असून, या सणाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांची शिष्टाई फळाला