एनएमएमटी बस थांबा मुख्य रस्त्यावर स्थलांतरित

 अखेर एनएमएमटी प्रशासन द्वारे तुर्भे सर्व्हिस रोडवरील बस थांबा स्थलांतरित

तुर्भे : तुर्भे येथील आय.सी.एल. शाळा जवळील सर्व्हिस रोडवरुननवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) एकही बस जात नसल्याने या ठिकाणी असलेला बस थांबा मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी अनेकदा प्रवाशांनी केली होती. या विषयी प्रसिध्द झालेल्या बातमीची नोंद घेत नुकताच सदर एनएमएमटी बस थांबा मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आला आहे. याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) उभारलेले अनेक बस थांबे प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत की बस थांब्यावर जाहिरात करणाऱ्या ठेकेदाराच्या फायद्यासाठी?, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या प्रकरणी प्रवाशांनी तक्रार करुनही त्या तक्रारीची एनएमएमटी प्रशासनाकडून नोंद घेतली जात नाही. त्यामुळे केवळ ठेकेदारांचा विचार करणाऱ्या एनएमएमटी प्रशासना विषयी प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे.

वाशी-तुर्भे लिंक रोड केवळ दोन मार्गिकेचा मार्ग आहे. या मुख्य मार्गावरुन प्रवासी बस जात असल्याने ठिकठिकाणच्या बस थांब्यावर बस थांबताच वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील बसथांबे काढून ते वाशी येथून तुर्भे येथे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर लावण्यात आले. मुख्य मार्गावरुन येणारी बस प्रवाशांना चढ-उतार करण्यासाठी सर्व्हिस रोडवर जाऊन पुन्हा मुख्य रस्त्यावरुन पुढे जाईल, अशी संकल्पना होती. मात्र, सदर प्रकार काही दिवसच चालू राहिला. त्यानंतर तो बंद पडल्यापासून सुमारे १० वर्षे आय.सी.एल. शाळेच्या जवळील सर्व्हिस रोडवरील बस थांबा तिथेच होता. मात्र, बस मुख्य मार्गावरच थांबत होती. प्रवाशांना या थांब्याचा कोणताही फायदा नसल्याने चक्क येथील एका रिक्षा एजंटने भंगार रिक्षा पार्क केल्या होत्या. तसेच मयुरेश कॉम्प्लेक्स मध्ये येणारे लोक या ठिकाणी थांब्याच्या सावलीत गाडी पार्क करत आणि प्रवाशी रणरणत्या उन्हात तळपत बसची वाट पहात होते. सदर बस थांबा मुख्य मार्गालगत लावण्यात यावा अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, त्या मागणीची नोंद घेतली जात नव्हती. या विषयी वृत्त प्रसिध्द झाल्यावर एनएमएमटी अधिकाऱ्याने या वृत्ताची नोंद घेत सदर बस थांबा मुख्य मार्गालगत स्थलांतरित केला. यामुळे आता ऊन- पाऊस यांपासून संरक्षण होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया गणपत आहेर या प्रवाशाने व्यक्त केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील लोकसेवा कार्यप्रणालीची ‘आसाम'च्या अभ्यासगटाकडून पाहणी