डॉ. राहुल गेठे महापालिका उपायुक्तपदी नियुक्त
डॉ. गेठे यांच्या समावेशनामुळे नवी मुंबई महापालिकेला कायमस्वरुपी उपायुक्त उपलब्ध
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) डॉ. राहुल गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास राज्य शाासनाने मान्यता दिली असून आता ते नवी मुंबई महापालिका उपायुक्त पदावर रुजू झाले आहेत. महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या २८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर उपायुक्त म्हणून डॉ. राहुल गेठे कार्यरत राहणार आहेत.
डॉ. राहुल गेठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून आपल्या कार्यकुशलतेचा आणि गतिमान कार्यवाहीचा ठसा उमटवलेला आहे. कोव्हीड प्रभावित काळात नवी मुंबई महापालिकेत उपायुवत पदावर कार्यरत राहून कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना डॉ. राहुल गेठे यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. विशेषत्वाने इंडिया बुल्स सारखे जम्बो कोव्हीड काळजी केंद्र उभारण्यात आणि ऑक्सिजन उपलब्धता करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. केवळ नवी मुंबई महापालिकाच नाही तर महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हीड कालावधीत तळोजा, मुरबाड, चाकण, येथील ऑक्सिजन प्रकल्पांवर सरकार मार्फत पर्यवेक्षक म्हणून डॉ. राहुल गेठे यांनी नियोजनबध्द कार्यवाही केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना गडचिरोली मध्ये सुरजागड लोहखनिज प्रकल्प पूर्ण करण्यात डॉ. गेठे यांनी विशेष भूमिका बजावलेली असून गडचिरोलीच्या विकास प्रक्रियेत ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी केलेली आहे.
सन २०१९ मध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, चिपळूण येथील पूरजन्य परिस्थितीमध्ये त्यांनी तत्पर मदत कार्य केलेले असून मागील महिन्यातील इर्शाळवाडी आपत्ती प्रसंगातही त्यांनी पूर्णवेळ मदतकार्यात सहभाग घेतलेला आहे.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर उपायुक्त संवर्गाची ११ पदे मंजूर असून शासनाकडील प्रतिनियुक्तीच्या कोट्यातील ५ उपलब्ध पदांपैकी एका पदावर डॉ. राहुल गेठे यांचे समावेशन करण्यात आलेले आहे. डॉ. राहुल गेठे यांच्या समावेशनामुळे नवी मुंबई महापालिकेला कायमस्वरुपी उपायुक्त उपलब्ध झालेला आहे.