वृक्ष तोड परवानगीला दिरंगाई

वृक्ष प्राधिकरणासाठी एमआयडीसी तज्ञ अधिकारी कधी नेमणार ?

वाशी : एमआयडीसी द्वारे ८०२ पदांची भरती करण्यात येणार असून, या भरतीत वृक्ष प्राधिकरणासाठी पदे नाहीत. त्यामुळे एमआयडीसी मधील वृक्ष प्राधिकरणाची कामे यापुढे देखील तांत्रिक अधिकाऱ्यांनाच पहावी लागणार आहेत. मात्र, एमआयडीसी वृक्ष प्राधिकरण विभागात स्वतंत्र पदविका वृक्ष अधिकारी नसल्याने वृक्ष तोड परवानगीला दिरंगाई होत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणासाठी एमआयडीसी प्रशासन तज्ञ अधिकारी कधी नेमणार?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

वृक्ष तोड, वृक्ष प्रत्यारोपण परवानगी तसेच बेकायदा वृक्ष तोड विरोधी कारवाई करण्याचे काम वृक्ष अधिकारी, वृक्ष तज्ञ यांच्या  मार्फत पाहिले जाते. नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीत या आधी नवी मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण मार्फत वृक्ष निगडित कामे पार पडली जात होती. मात्र, २०१६ साली ‘एमआयडीसी'ने स्वतःचे वृक्ष प्राधिकरण स्थापन केल्यापासून औद्योगिक वसाहतीमध्ये वृक्ष संदर्भात विविध परवानग्या या प्राधिकरण द्वारे दिल्या जात आहेत. परंतु, स्वतःचे वृक्ष प्राधिकरण असून, देखील महापे प्रादेशिक कार्यालयात एकही पदविका प्राप्त वृक्ष अधिकारी किंवा वृक्ष तज्ञ नेमण्यात आला नाही. या कार्यालयाचे वृक्ष प्राधिकरणावर वृक्ष अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या मार्फत वृक्ष तोड, वृक्ष छाटणी बाबत परवानगी प्रकिया राबवली जाते. मात्र, या विभागात वृक्ष अधिकारी, वृक्ष तज्ञ नसल्याने अभियंत्यामार्फतच सर्व प्रकिया राबबली जाते. आज नवी मुंबई मध्ये एमआयडीसी प्रमाणे सिडको महामंडळ कार्यरत असून, ‘सिडको'चे स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण आहे. मात्र, ‘सिडको'ने वृक्ष प्राधिकरणात पदविका अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम, १९७५ सुधारीत २०२१ प्रमाणे वृक्ष तोड, प्रत्यारोपण करण्यासाठी अर्ज आल्यास त्यास ४५  दिवसात परवानगी देणे बंधनकारक आहे. मात्र, एमआयडीसी मध्ये वृक्ष तोड, प्रत्यारोपण करण्यासाठी अर्ज आल्यास सदर अर्ज पडताळणी करण्यासाठी वन खात्याकडे पाठवला जातो. यासाठी ‘एमआयडीसी'ने जानेवारी-२०२३ मध्ये परिपत्रक काढले आहे. वन खात्यामार्फत पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल एमआयडीसी प्रशासनाकडे दिला जातो. त्यानंतर एमआयडीसी पुढील प्रकिया राबवते. मात्र, या प्रक्रियेस अधिक वेळ जात असल्याने परवानगीला दिरंगाई होत आहे.

एमआयडीसी तर्फे आता विविध ८०२ पदांची भरती करण्यात येणार असून, या भरतीत वृक्ष प्राधिकरणासाठी पदे नाहीत. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणासाठी एमआयडीसी प्रशासन तज्ञ अधिकारी कधी नेमणार?, असा सवाल आता वृक्ष प्रेमींकडून उपस्थित होत आहे.

एमआयडीसी मधील पद भरती बाबतचे सर्व निर्णय मुख्य कार्यालय अंधेरी येथे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. त्यामुळे पदविका वृक्ष अधिकारी नेमणूक बाबत तिथेच निर्णय घेतला जाणार आहे. - राजेंद्र बोरकर, प्रादेशिक अधिकारी - एमआयडीसी, महापे कार्यालय. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ. राहुल गेठे महापालिका उपायुक्तपदी नियुक्त