वाहतूक कोंडीत भर

विकासकांकडून मुख्य रस्त्याची अडवणूक?

वाशी : नवी मुंबई  शहरातील वाशी-कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावर वाशी सेक्टर-८ येथे एका खाजगी विकासकांकडून मागील दीड-दोन महिन्यापासून  रस्ता अडवून ठेवण्यात आला आहे. मात्र, सदर कृतीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या साऱ्या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाशी विभागात सध्या पुनर्विकासाच्या कामांनी जोर पकडला आहे. मात्र, सदर कामे करताना विकासकांकडून रस्त्याची नाहक अडवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. वाशी विभागात वाशी-कोपरखैरणे रस्ता सर्वात वर्दळीचा भाग समजला जातो. वाशी सेक्टर- ९ जैन मंदिर ते सेक्टर-११ मरीआई मंदिर दरम्यान  वाहन चालकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, याच रस्त्यावर वाशी सेक्टर-९ येथे एका खाजगी विकासकांकडून रस्त्यावर बोलार्ड उभे करुन मागील दीड ते दोन महिन्यापासून रस्त्याची अडवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच वाहतूक कोंडी असलेल्या या भागात सदर कृत्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालक नाराजी व्यक्त करीत आहेत. याबाबत वाशी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना विचारले असता, सदर रस्त्याची एक लेन महापालिकेने ‘वाहन पे अँड पार्किंग'साठी दिली आहे, असे उत्तर दिले. तर महापालिका उपायुवत (मालमत्ता विभाग) दिलीप नेरकर यांना विचारले असता, त्यांनी यावर कुठलेही भाष्य केले नाही. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वृक्ष तोड परवानगीला दिरंगाई