ठाणे येथे ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम'चे १६ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न
‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम'चे शिक्षण, वैद्यकीय, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत - राज्यपाल बैस
ठाणे : कोरोना महामारीच्या काळात ‘जैन समाज'ने आपल्या दानधर्माने देशातील लाखो लोकांना मदत केली. तेरा पंथ प्रोफेशनल फोरम या संस्थेचे शिक्षण, वैद्यकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. ठाणे नंदनवन येथे आयोजित ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम'च्या १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राज्यपाल बोलत होते.
आचार्य श्री महाश्रमण यांनी त्यांच्या चातुर्मासासाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल विशेषतः त्यांचे आभार मानतो. चातुर्मास म्हणजे श्रवण, चिंतन आणि ध्यानाद्वारे स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःची जाणीव करण्याची अनोखी संधी आहे. आचार्य महाश्रमण आज आपल्यामध्ये आहेत, यासाठी आपण सर्व भाग्यवान आहोत. ते एका धार्मिक संस्थेचे आचार्य असूनही त्यांचे विचार उदारमतवादी आणि र्धमनिरपेक्ष आहेत. त्यांनी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी ३ देश आणि २३ राज्यांचा पायी प्रवास केला आहे, असे राज्यपाल बैस म्हणाले.
तेरापंथ संस्था ‘अहिंसा यात्रा'च्या माध्यमातून व्यसनमुक्ती, नैतिकता आणि सद्भावना यांना प्रेरणा देते, जे एक अद्वितीय राष्ट्रीय काम आहे. संस्थेच्या कष्टाला, तपश्चर्येला माझा सलाम आहे. चांगले शिक्षण, चांगला व्यवसाय आणि यश मिळाल्यावर लोक धार्मिक कार्याकडे पाठ फिरवतात, असे सर्वसाधारणपणे दिसून येते, असेही राज्यपाल म्हणाले.
आचार्य महाप्रज्ञा यांच्या सल्ल्याने सुरु झालेल्या आचार्य महाप्रज्ञा ज्ञान केंद्राद्वारे आयएएस कोचिंग आणि बोर्डिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. सर्व समुदायातील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी इतरही शहरे आणि गावांमध्ये अशी केंद्रे उघडण्याचा विचार करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर, आचार्य महाश्रमण, साध्वी प्रमुखा विश्रुत विभा, मुनिवर महावीर कुमार, साध्वी वरिया संबुध्द यशा, ‘तेरापंथ व्यावसायिक मंच'चे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, मुख्य विश्वस्त चंद्रेश बाफना, गजराज पगारिया, सुशील अग्रवाल, व्यावसायिक नेते, सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी, व्यापारी, उद्योजक, आदि उपस्थित होते.