३०० पेक्षा जास्त क्षमता असताना केवळ १०० खुर्च्या बसविण्याचा निर्णय
ऐरोली मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये खुर्ची बसविण्यात मनमानी
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-१५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये खुर्च्या बसविण्याचे काम चालू असताना नवी मुंबई महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांनी मनमानी कारभार सुरु केल्याचे समजताच माजी नगरसेवक संजू वाडे यांनी तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या भवनमध्ये ३०० पेक्षा जास्त खुर्च्या बसविण्याची व्याप्ती असताना या भवनमध्ये केवळ १०० खुर्च्या बसविण्याचा निर्णय माजी नगरसेवक संजू वाडे यांनी तात्काळ हाणून पाडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असून, त्यांना जागा अपुरी पडते. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वास्तूची व्याप्ती मोठी असतानाही केवळ शंभर खुर्च्या लावून जनतेचे समाधान करणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच एका खुर्चीची किंमत एक लाख रुपये, या भवनमध्ये केवळ शंभर खुर्च्या बसवणे नियमबाह्य असून, सदर काम तात्काळ बंद करावे, अन्यथा या ठिकाणी उपोषणाला बसेन, असा इशारा नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि शहर अभियंता संजय देसाई यांना माजी नगरसेवक संजू वाडे यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये खुर्ची बसवण्याचे काम आमदार गणेश नाईक यांच्या फंडातून होत आहे. त्यांचा फंड वापरण्यास आमचा विरोध नाही. मात्र, सदर फंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मधील इतर भागांमध्ये वापरावा, असे प्रतिवि्रÀया संजू वाडे यांनी व्यक्त केली. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी सद्यस्थितीत सदर काम स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.