बेशिस्त रिक्षा चालकांमुळे रुग्णांच्या वाटेत अडथळा?
महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयासमोरील रस्ता मोकळा ठेवण्याची मागणी
वाशी : वाशी सेवटर-१० मधील नवी मुंबई महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयासमोर बेशिस्त रिक्षा चालकांमुळे रुग्णांची वाट अडली जात आहे. त्यामुळे रुग्णालयासमोरील रस्ता मोकळा ठेवण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.
वाशी सेक्टर-१० येथे नवी मुंबई महापालिकाचे प्रथम संदर्भ (सार्वजनिक) रुग्णालय आहे. नवी मुंबईतील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी नवी मुंबई शहरासह मुंबई, उरण, पनवेल आदी ठिकाणांहून रोज शेकडो रुग्ण उपचाराखातर येत असतात. त्याचसोबत अपघात ग्रस्त, अत्यवस्थ रुग्णांना देखील रुग्णवाहिकेतून या ठिकाणी आणले जाते. मात्र, या रुग्णालयाला रिक्षा चालकांनी कायम वेढा घातलेला असतो. या रुग्णालयासमोरील रस्ता दोन्ही बाजूनी ‘नो पार्किंग' घोषित केला असतानाही रस्त्याच्या दुतर्फा रिक्षा चालक उभे असतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन दवाखान्यात ये- जा करणाऱ्या रुग्णवाहिकांना वाट काढणे कठीण होऊन जाते. मात्र, महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयासमोर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अत्यवस्थ रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शवयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयासमोरील रस्ता मोकळा ठेवण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
वाशी मधील नवी मुंबई महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयासमोरील ‘नो पार्किंग झोन'मध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस शाखेमार्फत नित्यनेमाने कारवाई केली जात असली तरी देखील या ठिकाणी शाळा सुटते वेळी एक-दोन तास वाहतूक कर्मचारी उभा केला जाईल आणि रस्ता मोकळा ठेवला जाईल. - सतीश कदम, वाहतूक पोलीस निरीक्षक - वाशी शाखा.