झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए योजना लागू करण्याविषयी तत्वतः मंजूर
झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली तत्त्वतः मान्यता
नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा ते नेरूळ शिवाजीनगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासा संदर्भात मंत्रालय येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन ( MIDC ) अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासा संदर्भात एसआरए लागू करण्याविषयी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा, शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी एस आर ए योजना लागू करण्यासाठी सर्वप्रथम बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचे आदेश जारी केले व एमआयडीसी अंतर्गत असणाऱ्या 38000 च्या घरात असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी एस आर ए योजना लागू करण्याविषयी तत्वतः मंजूर केल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे MIDC अंतर्गत दिघा ते नेरुळ शिवाजीनगर पर्यंत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण झाल्यानंतर एसआरए योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.अशी माहिती शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी दिली.