रायगड जिल्ह्यात सर्व रुग्णाची नोंद खारघर मधील ‘आपला दवाखाना'मध्ये

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'ला खारघरकरांचा उत्तम प्रतिसाद

खारघर : आपल्या घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पनवेल महापालिकेने खारघर मध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु केला आहेत. या दवाखान्यात मोफत उपचार होत असल्याने खारघरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व प्रकारच्या तपासणी आणि रक्त चाचणी ‘आपला दवाखाना'मध्ये होत असल्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात रुग्णाची नोंद खारघर मधील दवाखान्यात होत असल्याचे आरोग्य विभागाकडून समजते.

नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी २०२३ रोजी खारघर, सेक्टर-१२ येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे ‘आपला दवाखाना'चे उद्‌घाटन करण्यात आले. ‘आपला दवाखाना'मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवांव्यतिरिक्त महिन्यातून नेत्र तपासणी, महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जात आहे. तसेच बालरोग, स्त्रीरोग, त्वचा, डोळ्याचे आजार, आदि विविध आजारांवर तपासणी, उपचार करण्यात येणार येत आहे.

विशेष म्हणजे पाच लाख लोकसंख्या असलेल्या खारघर वसाहतीत एकमेव दवाखाना असूनही रात्री १० वाजेपर्यंत रुग्ण तपासणीची वेळ असल्यामुळे परिसरातील गावे, पाडे आणि खारघर वसाहती मधील नागरिक या दवाखान्याचा लाभ घेत आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात ३१ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु  आहेत. त्यात खारघर मधील ‘आपला दवाखाना'ला चांगला प्रतिसाद मिळत असून दैनंदिन दिडशे ते दोनशेहून रुग्णाची नोंद होत असल्याचे सांगितले.
खारघर मध्ये एकमेव आपला दवाखाना आहे. त्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास पाचशे ते आठशे रुपये डॉक्टरची तपासणी शुल्क आणि रक्त चाचणीसाठी पाचशेहून अधिक रुपये आकारले जाते. खाजगी दवाखान्यात किमान हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागते. सर्वसामान्य कुटुंबाना एवढे पैसे खर्च करणे शक्य नसल्यामुळे उपचार आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी खारघरच्या मध्यभागी ‘आपला दवाखाना' सुरु असून सर्व प्रकारच्या मोफत सुविधा प्राप्त होत असल्यामुळे तसेच तज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.

खारघर परिसरात घरकाम, गवंडी, सुतारकाम, रंगकाम करणाऱ्यांसह नाका कामगारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गाव, पाडे आणि वसाहती मधील सर्वसामान्य कुटुंबांना स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात रुग्णास मोफत उपचार मिळत आहे. महापालिकेने खारघर, सेक्टर-२५ ते ४० परिसरात दुसरा आपला दवाखाना सुरु केल्यास अधिक सोयीचे होईल. - किर्ती मेहरा, सामाजिक कार्यकर्त्या.

माता सुरक्षित, तर घर सुरक्षित असते. त्याअनुषंगाने महिला रुग्णांना विविध आरोग्य सुविधा ‘आपला दवाखाना'मध्ये उपलब्ध होत आहे. याशिवाय तज्ञ डॉक्टर आणि औषध आणि रक्त चाचणी मोफत असल्यामुळे खारघर येथील ‘आपला दवाखाना'मध्ये दिवसातून दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद होत  आहे. येणाऱ्या रुग्णास योग्य प्रकारे सहकार्य करावे याविषयी कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाते. - डॉ. सागर दाते, विभागीय आरोग्य अधिकारी.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु करण्यात आला आहे. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णास चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी सदर दवाखाने सुरु करण्यात आले आहेत. ‘आपला दवाखाना'मध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळावी यासाठी काही तज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा सुरु आहे. - सचिन पवार, उपायुक्त (आरोग्य) पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्लॅब एकावर एक कोसळून दोघांचा मृत्यू