मालमत्ता कर भर करण्याकडे पनवेल नागरिकांचा वाढता कल

अवघ्या चार महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत 175 कोटीहून अधिक मालमत्ता कर जमा

पनवेल : यावर्षीच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल महिन्यापासून ते २३ ऑगस्ट पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत १७५ कोटी रुपयांहुन अधिक रवकमेचा मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिकेत आजवर चार महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचा या विशेष मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला. याचाच सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत १७५कोटीहून अधिक रुपयांची भर पडली आहे.

मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये दरमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरल्यास त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. ज्या नागरिकांना अजुनही मालमत्ता कराची बिले मिळाली नाहीत, त्यांनी महापालिकेच्या १८०० ५३२०३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास कॉल सेंटरच्या माध्यामातून बिल घेता येणार आहे. तसेच मालमत्ता करासंदर्भातील हरकती जसे की नावामध्ये बदल, मालमत्तेचे बाह्य स्वरुपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास, स्वमालकी असताना भाडेतत्वावर कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज संबंधित प्रभाग कार्यालयाकडे सादर करावेत.

त्याचप्रमाणे मालमत्ताधारकांना नावामध्ये बदल करायचा असल्यास महापालिकेच्या ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. या ॲपमध्ये नाव बदलाकरता रिक्वेस्ट केल्यास महापालिकेकडून  नाव बदलानंतर संबधितांस नोटीफिकेशन मिळणार आहे. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने ‘PMC TAX APP’ विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org  या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

दरम्यान, सदर सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा. तसेच मालमत्ताकराबाबत काही शंका असल्यास १८०० ५३२०३४० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या पर्यावरणशील प्रकल्पांची पाहणी