दि.बा.पाटीलः एक चळवळ स्पर्धा संयोजन समिती ‘दिबां'च्या चरणी नतमस्तक

जासई येथे स्पर्धेच्या आयोजन संदर्भात मार्गदर्शन बैठक संपन्न

नवी मुंबई : क्रांतिपुत्र तथा लोकनेते दि. बा. पाटील यांच्या संघर्षाची गाथा विविध स्पर्धाच्या माध्यमातून सर्व समाजाला कळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दि.बा.पाटीलः एक चळवळ! या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या पदाधिकाऱ्यांसह स्पर्धेच्या संयोजन कमिटीने २२ ऑगस्ट रोजी थेट लोकनेते ‘दिबां'चे मूळ गांव जासई गाठले.

 लोकनेते ‘दिबां'ची जन्मभूमी असलेल्या जासई येथील ‘रयत शिक्षणसंस्था'च्या छत्रपती शिवाजी महाराज हायस्कुल आणि लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजला भेट दिली. यावेळी जासई येथील ‘रयत शिक्षण संस्था'च्या संकुलात पोहोचताच ‘दि.बा.पाटील : एक चळवळ'चे सर्व स्पर्धा सयोजक लोकनेते ‘दिबां'च्या स्मारकाला भेट देत नतमस्तक झाले. यावेळी ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या हस्ते ‘दिबां'च्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात स्पर्धेच्या आयोजन संदर्भात मार्गदर्शन बैठक संपन्न झाली. स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते दशरथ भगत, संयोजन समितीतील जेष्ठ रंगकर्मी रवि वाडकर, नाट्य क्षेत्रात लेखन, दिग्दर्शक-भूमिका करणारे प्रशांत निगडे, जेष्ठ पत्रकार-स्तंभलेखक आणि ‘दिबां'चे सुधाकर लाड, नवी मुंबईतील ख्यातनाम कवी-नाटककार-लेखक गजआनन म्हात्रे, विमानतळ नामकरण चकवळीतील प्रथम आंदोलक तथा स्पर्धा आयोजक ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे प्रवक्ते शैलेश घाग, पत्रकार अनिलकुमार उबाळे, संजय महाडिक, सुरेश पाटील, कौस्तुभ कटेकर, ‘रयत शिक्षण संस्था'चे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील, ‘विमानतळ नामकरण कृती समिती'चे विनोद म्हात्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांच्यासह जासई ग्रामस्थ रघुनाथ ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे, अरुणा घरत, योगिता म्हात्रे, सुमन म्हात्रे, पुष्पा म्हात्रे, वंदना घरत, अमोल पाटील, आदि उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य अरुण घाग यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. दिबा चळवळ स्पर्धेचे प्रवक्ते शैलेश घाग यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. ‘संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत आणि स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक रविंद्र वाडकर यांनी स्पर्धेचे महत्व विषद करीत उरण तालुक्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, दिबा प्रेमींनी स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले.

भूमीपुत्र, शेतकरी, कामगार, कष्टकरी समाजाचे स्फुर्तीस्थान तथा लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्यकर्तृत्व संपूर्ण जगाला कळावे, या उद्देशाने ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या वतीने दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८८५०३१५७९५ / ९८२११९६५७५ /९००४३२९४५७ भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर भर करण्याकडे पनवेल नागरिकांचा वाढता कल