सानपाडामधील नागरिक कर भरत नाही काय?

सिताराम मास्तर उद्यान-क्रीडांगणातील जंगली गवत काढण्याची मागणी

नवी मुंबई : नेरुळ नोडमध्ये महापालिका प्रशासन उद्यान आणि क्रीडांगणात वाढलेले जंगली गवत काढून टाकते. सानपाडा, सेक्टर-७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील आणि क्रीडांगणातील जंगली गवत काढून टाकण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करुनही अद्यापपर्यंत जंगली गवत काढले जात नाही. त्यामुळे सानपाडा मधील नागरिक महापालिका प्रशासनाकडे कर भरत नाही काय? असा प्रश्न ‘भाजपा युवा मोर्चा'चे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना लेखी निवेदनातून विचारला आहे.

सानपाडा, सेक्टर-७ मधील सिताराम मास्तर उद्यानात पावसामुळे वाढलेले जंगली गवत तातडीने काढून टाकण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सानपाडा, सेक्टर-९ मध्ये मिलेनिअम सोसायटी आणि नवभारत प्रेसच्या समोर महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. या उद्यानात सानपाडा कॉलनीतील रहिवाशी चालण्यासाठी आणी फिरण्यासाठी येत असतात. सानपाडा, नेरुळ, जुईनगर, तुर्भे परिसरातील सदरचे मोठे आणि विस्तीर्ण उद्यान-क्रीडांगण आहे. मैदानावर पावसामुळे जंगली गवत वाढल्याने मुलांना मैदानावर खेळण्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे मुले घरात मोबाईलवर गेम, टीव्ही नाहीतर संगणकावर कार्यरत असतात. महापालिका प्रशासनाने जर तातडीने गवत काढले तर मुलांना क्रिकेट, फुटबॉल खेळणे शक्य होईल, असे पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात नमू्‌द केले आहे.

दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून नेरुळ, सेक्टर-४ मधील क्रीडांगणाची १९ ऑगस्ट रोजी सफाई करण्यात आली आहे. जर नेरुळ मध्ये क्रीडांगणावरील जंगली गवत महापालिका प्रशासन काढू शकते, तर सानपाडा सेक्टर-७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील जंगली गवत का काढले जात नाही? सानपाडावासीय महापालिकेकडे कराचा भरणा करत नाही काय? अडीच महिने पडत असलेल्या पावसामुळे सिताराम मास्तर उद्यान-क्रीडांगणात जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. परिणामी, या ठिकाणी येणाऱ्या रहिवाशांना डासांचा आणि चिलटांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना उद्यानात आणि क्रीडांगणात पावसामुळे वाढलेले जंगली गवत काढण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दि.बा.पाटीलः एक चळवळ स्पर्धा संयोजन समिती ‘दिबां'च्या चरणी नतमस्तक