‘आसाम'च्या अभ्यासगटाने घेतली नवी मुंबईतील लोकसेवा कार्यप्रणालीची माहिती

‘राज्य सेवा हक्क आयोग'चे कोकण विभागीय आयुक्त बलदेव सिंह यांच्याकडून कार्यप्रणालीबद्दल समाधान

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध लोकसेवांचा आढावा घेताना महाराष्ट्र शासनाच्या ‘राज्य सेवा हक्क आयोग'चे कोकण महसूली विभाग आयुक्त बलदेव सिंह यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे ५१ लोकसेवांपैकी २८ लोकसेवा सद्यस्थितीत सद्यस्थितीत ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या जात असून त्यामध्ये वाढ करीत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याविषयी तत्पर कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना त्यांनी दिल्या.

आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा-कार्मिक प्रशासन विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- २०१५ बाबत माहिती घेण्यासाठी आयोजित अभ्यास दौऱ्यांंतर्गत २२ ऑगस्ट रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास अभ्यासगटाने भेट देत लोकसेवा पूर्ततेबाबतची कार्यप्रणाली जाणून घेतली. याप्रसंगी उपस्थित राहत ‘राज्य सेवा हक्क आयोग'चे कोकण  विभागीय आयुक्त बलदेव सिंह यांनी उपस्थित राहत महापालिका मार्फत राबविण्यात येणारी लोकसेवा वितरण प्रणाली अभ्यास गटासमवेत बारकाईने जाणून घेतली आणि मौल्यवान सूचना केल्या.

याप्रसंगी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा-कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव पांचाली ककाती, उपसचिव मिताली लाहकर तसेच ‘राज्य सेवा हक्क आयोग'चे कोकण विभाग सहसचिव माणिक दिवे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, ‘राज्य सेवा हक्क प्रणाली'चे नमुंमपा नोडल अधिकारी शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

या दौऱ्याप्रसंगी उपस्थितांना महापालिकेच्या विकास वाटचालीचा आढावा घेणारी ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-२०१५ अंतर्गत महापालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या ५१ लोकसेवांबाबत सविस्तर माहिती दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सद्यस्थितीत ५१ लोकसेवा पुरविल्या जात असून त्यापैकी २८ लोकसेवा ऑनलाईन पुरविल्या जात आहेत. उर्वरित २३ ऑफलाईन दिल्या जाणाऱ्या सेवाही लवकरच ऑनलाईन पुरविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे.

 महापालिकेकडे एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत ५१ लोकसेवांकरिता ४९,५२० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४८,७५९ अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे लोकसेवा पूर्ततेची महापालिकेची टक्केवारी ९८ टक्के इतकी असून ती समाधानकारक आहे. मात्र, ती १०० टक्के करण्याकडे वाटचाल सुरु ठेवावी, असे आयुक्त बलदेव सिंह यांनी सूचित केले. प्राप्त लोकसेवा अर्जांवर विहित कालावधीत १०० टक्के कार्यवाही करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला पारितोषिक दिले जाते अशी माहिती देत बलदेव सिंह यांनी यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या पदनिर्देशित अधिकाऱ्याचा या पारितोषिक प्राप्त अधिकाऱ्यामध्ये समावेश व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

‘आसाम'च्या अतिरिक्त सचिव पांचाली ककाती तसेच उपसचिव मिताली लाहकर यांनी यावेळी लोकसेवापूर्ततेविषयी विविध प्रश्न विचारुन लोकसेवा पूर्ततेच्या कार्यवाहीची सखोल माहिती जाणून घेतली. वाशी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राला भेट देऊन त्यांनी लोकसेवा प्रदान करण्याच्या कार्यवाहीची प्रत्यक्ष पाहणी करत लोकसेवा हक्क अध्यादेशाद्वारे देण्यात येणाऱ्या लोकसेवांची कार्यप्रणाली जाणून घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडामधील नागरिक कर भरत नाही काय?