सिडको वसाहत मधील पाणी कपात रद्द होण्याची शक्यता

सिडको अधिकाऱ्यांच्या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष?

खारघर : ‘सिडको'च्या वसाहतीत २७ जूनपासून १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. यादरम्यान मुंबई महापालिकेने दहा टक्के लागू केलेली पाणी कपात रद्द करुन नागरिकांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सिडको वसाहत मधील पाणी कपाती संदर्भात आज २३ ऑगस्ट रोजी ‘सिडको'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीत पाणी कपातीचा विषय चर्चेला येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सिडको वसाहतीत पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणात सध्या ८० टक्के पाणी साठा आहे. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने ‘सिडको'ने २७ जूनपासून १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. जुलै महिन्यात धरणातील पाणी  साठा जवळपास ९१ टक्क्यांवर पोहोचला होता. या काळात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जलसिंचन विभागाच्या नियमानुसार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे हेटवणे धरणातील पाणी साठा  ८० टक्क्यांवर येवून पोहोचला आहे. दहा महिने पाणी पुरेल एवढा पाणी साठा हेटवणे धरणात आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे  मुंबई महापालिकेने १ जुलै पासून लागू केलेली १० टक्के पाणी कपात मागे घेतली आहे. त्यामुळे ‘सिडको'च्या बैठकीत पाणी कपाती विषयी कोणता निर्णय होणार? याकडे सिडको वसाहत मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, धरणात ८० टक्के पाणी साठा आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. पुढील काही दिवसात पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यामुळे बैठकीत पाणी कपातीच्या निर्णयाविषयी चर्चा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तळोजा मध्ये दिवसाआड पाणी पुरवठा...
तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे पाण्याची समस्या गंभीर आहे. तळोजा फेज-१ आणि २ वसाहतीत  दिवसाआढ पाणी पुरवठा केला जात आहे. मोठ-मोठ्या सोसायटीमध्ये आजही पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. आठ दिवसापूर्वी तळोजा येथील ‘सिडको'च्या आसावरी गृहनिर्माण सोसायटी मधील रहिवाशांनी तळोजा येथील ‘सिडको'च्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच तळोजा फेज-१ वसाहतीत ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांकडून पाण्याचा गैरवापर होत असून सदर कामगारांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी तक्रार ‘तळोजा कॉलनी फेडरेशन'कडून ‘सिडको'कडे  केली जाणार आहे. तर खारघर वसाहतीत आजही अनेक भागामध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहे. खारघर वसाहतीसाठी ९० एमएलडी पाण्याची आवश्यकता असून दैनंदिन ६५ एमएलडी पाणी साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तळोजा आणि खारघर मध्ये पाणी विषय गंभीर होण्याची शक्यता आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आसाम'च्या अभ्यासगटाने घेतली नवी मुंबईतील लोकसेवा कार्यप्रणालीची माहिती