दिघा रेल्वे स्थानक महिना अखेरपर्यंत सुरु करण्याची मागणी

खा. राजन विचारे यांचे रेल्वे प्रशासनाला पत्र
 

नवी मुंबई ः ‘ठाणेे'चे खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या नवी मुंबईतील ट्रान्स-हार्बर मार्गावरील मागील ४ महिन्यांपासून तयार झालेले दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेरपर्यंत सुरु करावे, अन्यथा आम्ही जबरदस्तीने रेल्वे रोको करुन दिघा रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन करु, असा थेट इशारा ‘मध्य रेल्वे'चे महाव्यवस्थापक नरेश लालवानी आणि मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांना पत्राद्वारे दिला आहे.

स्थानिक खासदार या नात्याने नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या विनंतीला आणि मागणीनुसार मी रेल्वे मंत्री अश्विनी कुमार, राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच रेल्वे प्रशासन यांच्याकडे वारंवार विनंती करुन सुध्दा दिघा रेल्वे स्थानक सुरु करण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. जर दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्‌घाटनासाठी रेल्वे प्रशासनाला वेळ नसेल तर रेल्वे प्रवाशी आणि दिघा वासियांकडून दिघा रेल्वे स्थानक सुरु करु, असे खा. राजन विचारे यांनी संबंधितांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

तसेच ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमीपुजन सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. या प्रकल्पातील झोपड्यांचे पुनर्वसन होत नसल्याने सदरचा प्रकल्प रेंगाळला आहे. वास्तविक पाहता सदरचा महत्वाकांक्षी प्रकल्प रद्द होऊ नये म्हणून मी एमआरव्हिसी विभागाकडे पाठपुरावा करुन प्रकल्प दोन टप्प्यात करुन पहिल्या टप्प्यात दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण करुन घ्ोतले आहे. दिघा परिसरात नव्याने सुरु होणाऱ्या आयटी कंपन्या आणि त्यामध्ये बाहेरुन येणारा नोकरदार वर्ग यांना ऐरोली रेल्वे स्थानकाचा किंवा ठाणे रेल्वे स्थानकाचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये प्रवाशांचा वाया जाणारा वेळ आणि पैसे याची बचत होण्यासाठी त्याचबरोबर दिघावासियांना न्याय मिळवून देण्यासाठी या महिना अखेर पर्यंत दिघा रेल्वे स्थानका सुरु करा, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको वसाहत मधील पाणी कपात रद्द होण्याची शक्यता