नवी मुंबई पोलीस दलात आय बाईक झाल्या कार्यान्वित

घटनास्थळावरील वस्तुजन्य व पुरावे शास्रोक्त पद्धतीने तत्काळ गोळा करणे होणार अधिक सुलभ 

नवी मुंबई : गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरावा हा महत्वाचा भाग असल्याने नवी मुंबई पोलिसांनी आता गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीने घटनास्थळावरील पुरावे तत्काळ व योग्य पद्धतीने गोळा करण्यासाठी आपल्या हद्दीत 6 आय बाईक कार्यान्वित केल्या आहेत.नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या आय बाईकचा शुभारंभ राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते मंगळवारी झाला. एखाद्या गुन्ह्यांची माहिती मिळताच अवघ्या काही वेळात घटनास्थळावर पोहोचणाऱया आय बाईकच्या माध्यमातून वस्तुजन्य व भौतिक पुरावे शास्रोक्त पद्धतीने गोळा करणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे न्यायालयात गुन्हे शाबित होण्याच्या दृष्टीने या पुराव्यांची पोलिसांना चांगलीच मदत होणार आहे. 

एखाद्या गुन्ह्यांच्या ठिकाणी पुरावे गोळा करताना पोलिसांकडून अनेकवेळा घाईगडबडीत काही त्रुटी राहुन जातात. त्यामुळे सदोष पुराव्या अभावी आरोपी सुटण्याची शक्यता असते. अनेकवेळा पुराव्या अभावी आरोपीचा माग घेणे देखील कठीण होऊन बसते. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीने महत्वाचा भाग असलेले पुरावे योग्य पद्धतीने गोळा करुन त्यांची योग्य पद्धतीने हातळणी होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 6 आय बाईक कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या आय बाईकमध्ये किट बॅग, डिजिटल कॅमेरा व घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची साधने व उपकरणे ठेवण्यात आली आहेत.

  या आय बाईकच्या माध्यमातुन पोलिसांना गल्ली बोळात, दुर्गम भागात तत्काळ पोहोचून घटनास्थळावरील योग्य पद्धतीने पुरावे गोळा करणे, त्यानंतर त्याची हाताळणी व्यवस्थितरित्या करुन त्याची योग्य पद्धतीने पॅकींग करता येणार आहे. आय-बाईकवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना मुंबईतील कलिना व औरंगाबाद येथील फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूट मधुन घटनास्थळावरील पुरावे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखादी घटना घडल्यास अवघ्या काही मिनीटामध्ये आय बाईक घटनास्थळी पोहोचुन योग्य पध्दतीने आवश्यक असलेले पुरावे व्यवस्थितरित्या संकलीत करणार आहे. यासाठी दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी 2 पोलीस कर्मचारी या आय बाईकसाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.

आय बाईक पोलिसांना मदतगार ठरणार  

नवी मुबंई पोलीस दलात कार्यरत असलेली इन्व्हेस्टीगेशन व्हॅनने हत्येसह बलात्कार तसेच घरफोडी सारख्या अनेक गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन गुन्हे उकल होण्याच्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. मात्र काही गुन्ह्याच्या ठिकाणावरील पुरावे हे तत्काळ शास्रोक्त पद्धतीने गोळा करणे आवश्यक असते. नवी मुंबई पोलीस दलाची हद्द मोठी असल्याने इन्वेस्टीगेशन व्हॅनला प्रत्येक ठिकाणी, दुर्गम भागात, अथवा गल्ली बोळात तत्काळ पोहोचण्यास अडचणी येत होत्या. याचाच विचार करुन पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी आय बाईक कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इन्वेस्टीगेशन व्हॅन येण्याची वाट न पाहता गुन्ह्याच्या ठिकाणी, गल्ली बोळात, दुर्गम भागात आय बाईक तत्काळ पोहोचुन पुरावे गोळा करण्याचे काम करणार आहे. त्यामुळे आय बाईक पोलिसांना मदतगार ठरणार आहेत.  

पुरावे शास्रोक्त पद्धतीने तात्काळ गोळा करणे आवश्यक
कोणत्याही तपासात गुन्ह्याची जागा महत्त्वाची भूमिका बजावते.गुन्हयाचा स्पॉट पंचनामा करणे, भौतिक, रासायनिक, जैविक आणि सशर्त पुरावे शास्त्रोक्त पद्धतीने तात्काळ गोळा करणे आणि जतन करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणाची छायाचित्रे घेणे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा देखील तपास प्रक्रियेचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. सध्या वाशी, तुर्भे, पनवेल आणि पोर्ट या चार विभागात ६ आय बाईक कार्यान्वित करण्यात आल्या असून गत २ महिन्यात या आय बाईकने ४५१ गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. 

न्यायालयात वैद्यकीय पुराव्यांना जास्त महत्व
काही गुन्ह्यात व्यवस्थितरीत्या पुरावे गोळा न केल्यामुळे तपासात अडचणी येत असतात. त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यत पोहोचणे देखील काही वेळा कठीण होऊन बसते. बऱ्याच केसेस मध्ये कमकुवत पुराव्यांचा आरोपींना फायदा होतो. त्यामुळे ते निर्दोष सुटतात. आता न्यायालयाकडून देखील वैद्यकीय पुराव्यांना (सायंटीफीक एव्हीडन्स) जास्त महत्व दिले जात असल्याने शात्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करणे पोलिस दलाला अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे त्या पद्धतीने पोलिस अधिकारी, कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका तर्फे गणेश उत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना