सिंगल युज प्लास्टीक बंदीसाठी ठाणे महापालिका सतर्क

ठाणे महापालिका मार्फत सिंगल युज प्लास्टीकचे उत्पादन वापर बंदीची कडक अंमलबजावणी सुरु

ठाणेः ठाणे शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी ठाणे महापालिका मार्फत सिंगल युज प्लास्टीकचे उत्पादन वितरण, विक्री, साठवणूक आणि वापर बंदीची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम-२०२१ नुसार एकल वापर (सिंगल युज) प्लास्टीक वस्तू प्रतिबंधित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात एकल वापर प्लास्टीक बाबतची अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी दिल्या असून सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकारपणे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभाग समिती स्तरावरील सहाय्यक आयुवत, घनकचरा, शिक्षण, आरोग्य, अतिक्रमण- निष्कासन, उपआयुक्त मुख्यालय, सुरक्षा, संगणक, समाजविकास, स्थावर मालमत्ता आणि प्रदुषण नियंत्रण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश सदर बैठकीत देण्यात आले.

सिंगल युज प्लास्टीकच्या अंमलबजावणीसाठी व्यापक प्रमाणात महापालिका मुख्यालय तसेच प्रभागामध्ये जनजागृती करणे, प्रभाग कार्यालयात बॅनर, बोर्ड लावणे, प्रभाग कार्यालयामध्ये येणाऱ्यांना प्लास्टीक पिशवीबाबत मज्जाव करणे, प्रभागामधील उपक्रमांमध्ये प्लास्टीक बॉटल्सचा वापर टाळणे, त्यासाठी पाण्याचा जार आणि कागदी कप, प्लास्टीक वेस्टनचे बुके वापर बंद करणे तसेच प्रभाग समितीच्या अखत्यारितील मंगल कार्यालयामध्येही सिंगल युज प्लास्टीक बंदी प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाने दर मंगळवारी आणि गुरुवारी सर्व प्रभागांमध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत दुकान, हातगाड्यांवर सिंगल युज प्लास्टीक बंदीबाबत करवाई करणे, कापडी पिशवी खरेदीबाबत कार्यवाही करणे आणि मार्केटमध्ये त्याचे परिचलन करणेसाठी योजना आखणे. शिक्षण विभागाने महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये सिंगल युज प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करणे तसेच शाळांमध्ये शपथ घ्ोणे, रॅली काढणे विद्यार्थ्यांना घरातील प्लास्टीक जमा करुन आणावयास सांगणे, तसेच सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत निबंध, पेंटीग, टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धा आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्या.
समाज विकास विभागाने महिला बचत गटामार्फत कापडी पिशवी तयार करुन विक्रीसाठी मार्केट परिसरात स्टॉल्स लावणे, झोपडपट्टीमधून कापड गोळा करुन कापडी पिशव्या तयार करुन त्याबाबत योजना सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

आरोग्य आणि अतिक्रमण विभागाने रहिवाशी, व्यापारी संकुलांमध्ये शाळा, झोपडपट्टी येथे सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत पत्रक चिटकविणे तसेच मटण, मासे, चिकन, हातगाडी, दुकानांवर प्लास्टीक आढळल्यास कारवाई करणे. प्रदुषण नियंत्रण विभागाने महापालिका कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात दंडाची कारवाई करणे, जप्त केलेले प्लास्टीक संस्थांच्या ताब्यात देणे. मॉल, मार्केट मध्ये बॅनर, माहितीपत्रक अथवा स्टॅण्डीज उभारणे,  नागरिकांमध्ये जनजागृती करणे, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार दर महिन्याला सिंगल युज प्लास्टीक बंदीबाबत कारवाई करणे यासह सर्व माहिती संकलित करत डेटाबेस तयार करुन केलेल्या कारवाईचा मासिक  अहवाल तयार करावा, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या. याशिवाय ठाणे महापालिकेच्या ज्या कार्यालयांमध्ये विविध समारंभामध्ये सिंगल युज प्लास्टीक टाळून पर्यावरणपुरक वस्तू वापरण्यात येतात, तेथे भाडे कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे. संगणक विभागाने सिंगल युज प्लास्टीक बंदीबाबत सोशल मिडीया, फेसबुक, टि्‌वटरवरुन प्रसिध्दी करण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुमारे ४ हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत ; व्यापारी, शेतकरी, निर्यातदार चिंतेत