‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी सूचनापेटी

महापालिका अधिकारी-कर्मचारी, नागरिकांनी ३० ऑगस्ट पर्यंत संकल्पना, सूचना लेखी स्वरुपात देण्याचे आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई शहराची स्वच्छता, ओळख बनलेली असून स्वच्छतेचा ब्रँड आणखी दृढ करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाच्या बळावर नवी मुंबई महापालिका सज्ज झालेली आहे. कोणताही नावलौकिक प्राप्त करण्यापेक्षा तो नियमितपणे टिकवणे अधिक कठीण गोष्ट असते. त्यादृष्टीने स्वच्छता कार्यातील सुधारणेच्या विचार प्रक्रियेत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कोणत्याही विधायक उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांनीही सक्रिय सहभागी व्हावे अशी भूमिका आयुक्त राजेश नार्वेकर नजरेसमोर ठेवली आहे.

या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यदिनी स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी फेसबुक लाईव्ह द्वारे थेट संवाद साधताना आयुक्त नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये वैचारिक लोकसहभाग घेणारा नाविन्यपूर्ण उपक्रम मांडला.

महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानाच्या आसपासच्या इमारती आणि विभागातील स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेऊन त्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी जागरुकतेने काम करुन स्वच्छतेसाठी योगदान देणारा कर्मचारी बनावे, अशी संकल्पना आयुक्तांनी मांडली. त्याद्वारे महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांचा शहर स्वच्छता कार्यात आणखी प्रभावी रितीने सक्रिय योगदान घेण्याचा नवा संकल्प मांडण्यात आला.

‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या अनुषंगाने ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन कल्पना, नवे विचार पुढे यावेत आणि त्याचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षण कार्याला व्हावा यादृष्टीने महापालिका मुख्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत सूचनापेटी लावण्याचे आयुक्तांमार्फत जाहीर करण्यात आले. त्यानुसार महापालिका मुख्यालयात प्रवेशद्वारासमोर दर्शनी भागी सूचनापेटी ठेवण्यात आलेली आहे. या सूचनापेटी मध्ये महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनी तसेच नवी मुंबईकर नागरिकांनी ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत शहर स्वच्छता कार्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, सूचना लेखी स्वरुपात टाकाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सूचनापेटीच्या संकल्पनेबद्दल माहिती देताना आपल्या मनोगतात आयुक्तांनी स्पष्ट भूमिका मांडली. स्वच्छता कार्यात नवे काही करण्याबाबत आयुक्त, विभागप्रमुख आणि अधिकारी यांच्या पातळीवर अनेकदा विचार मंथन, चर्चा केली जाते. स्वच्छतेबाबत काय करता येईल किंवा इतर ठिकाणी काय केले जाते याविषयी सागोपांग विचारविनिमय होतो. तथापि बरेचदा त्याच त्याच लोकांनी विचार केल्यामुळे त्या प्रक्रियेत तोचतोचपणा आलेला दिसून येतो. त्यामुळे स्वच्छतेविषयी वेगळ्या दृष्टीने विचार होऊन काही नव्या संकल्पना पुढे येणे गरजेचे वाटते. अशा नाविन्यपूर्ण सूचना-संकल्पना, ज्यांचा शहर स्वच्छता कार्यात प्रत्यक्ष लाभ होईल.

स्वच्छतेविषयी काही नव्या संकल्पना महापालिका अधिकारी-कर्मचारी यांना किंवा जागरुक नागरिकांना मांडायच्या असतील तर त्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सूचनापेटीची संकल्पना साकारण्यात आली आहे. शहर स्वच्छतेतील अपेक्षित सुधारणांबाबत मौल्यवान संकल्पना ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत कागदावर लिहून अथवा टंकलिखित करून स्वच्छ सर्वेक्षणाकरिता महापालिका मुख्यालयात दर्शनी भागी ठेवलेल्या विशेष सूचनापेटीत टाकाव्यात. या सूचनांमधील प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यायोग्य सूचना देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांना विशेष प्रशस्तीपत्र प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिंगल युज प्लास्टीक बंदीसाठी ठाणे महापालिका सतर्क