पनवेल मध्ये कर पुनर्निरिक्षण मोहिमेत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

चारही प्रभागामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका मालमत्ता कर विभाग मार्फत १७ आणि १८ ऑगस्ट या कालावधीत प्रभाग समिती ड, पनवेल कार्यालयांमध्ये मालमत्ता धारकांच्या मालमत्ता संबंधित तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यासाठी कर पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा या प्रभागनिहाय मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या मोहिम दरम्यान सुमारे ९७५ नागरिकांनी अर्ज दाखल केले.

पनवेल महापालिका द्वारे ७ ऑगस्ट पासून प्रभाग निहाय कर पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी लोकाग्रहास्तव नागरिकांना सोयीचे व्हावे या उद्देशाने प्रभाग निहाय कर पुनर्निरीक्षण मोहीम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नागरिकांच्या मालमत्ता कर बाबत त्रुटींचे निवारण करण्यासाठी ७ आणि ८ ऑगस्ट रोजी खारघर प्रभाग कार्यालयात मालमत्ता कर पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी सुमारे २०७ नागरिकांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर प्रभाग समिती ब कळंबोली कार्यालय येथे ९ आणि १० ऑगस्ट रोजी मालमत्ता कर पुनर्निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. याठिकाणी १८०० पेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज दाखल केले. तसेच प्रभाग समिती क कामोठे कार्यालय येथे ११ आणि १२ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या कर पुनर्निरीक्षण मोहीमेध्ये २ हजारांहून अधिक नागरिकांनी अर्ज दाखल केले. या तिन्ही ठिकाणी नागरिकांना त्यांच्या बिलामधील किरकोळ दुरुस्ती तात्काळ करुन देण्यात आली. तसेच बिलामधील इतर दुरुस्त्यांचे कामही वेगाने करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका उपायुवत (मालमत्ता कर विभाग) गणेश शेटे यांनी दिली.

कर पुनर्निरीक्षण मोहिमेमध्ये नागरिकांच्या किरकोळ तक्रारी तत्काळ सोडविल्या जात आहेत. महापालिकेने एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत १७५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे, मालमत्ताधारकांना मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी महापालिकेने ‘PMC TAX APP” मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच . www. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही मालमत्ताधारकांना आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे, असे महापालिका उपायुवत (मालमत्ता कर विभाग) गणेश शेटे यांनी सांगितले.

मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास त्यांनी १८००२२७७०१ या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, कर पुनर्निरीक्षण माहिमेअंतर्गत मालमत्तेचे बाह्य स्वरुपाच्या मोजमापामध्ये काही त्रुटी राहिली असल्यास, वापरामधील तफावत असल्यास, स्वमालकी असताना भाडेतत्वावर कर आकारणी झाली असल्यास मालमत्ता धारकांनी हरकती अर्ज सादर करावेत, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्तांना कलम १२९ अनुसार कर आकारणी करण्यात येत आहे, मालमत्ताधारकास या संदर्भात काही हरकत असल्यास त्यांनी आपले हरकती अर्ज करावेत. तसेच पूर्णत्व प्रमाणपत्र , भोगवटाप्रमाणपत्र किंवा वापर दिनांकापासुन कर आकारणी, अनधिकृत शास्ती आकारणी बाबत, प्राथमिक कर आकारणी मध्ये नाव नोंद करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबात मालमत्ताधारकांच्या काही हरकती असल्यास त्यांनी आपला हरकत अर्ज महापालिकेकडे दाखल करावा, असे आवाहनही महापालिका उपायुवत गणेश शेटे यांनी केले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बहुमजली वाहनतळाचे काम पूर्ण