बहुमजली वाहनतळाचे काम पूर्ण

बेलापूर मधील पार्किंग समस्या लवकरच निकाली

वाशी : नवी मुंबई शहरातील सीबीडी-बेलापूर मधील वाहन पार्किंगवर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिका तर्फे बहुमजली वाहनतळ इमारत उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सदर वाहनतळ नागरिकांसाठी खुले होणार असल्याने बेलापूर भागातील वाहन पार्किंग समस्या निकाली निघणार आहे.

नवी मुंबई शहर झपाट्याने विकसित होत असताना नवी मुंबई शहरात वाहन संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबई शहरात नोंदीत वाहन संख्या सात लाखाच्या घरात पोहोचली आहे. याशिवाय नवी मुंबई शहरात रोज ये-जा करणारी २० % तरंगती वाहने आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरांमध्ये आज पार्किंग समस्या बिकट झाली आहे. या समस्यावर तोडगा काढण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना अंमलात आणल्या जात असून, पाकर्िंग नियोजनासाठी महापालिकाने बहुमजली वाहनतळाचा पर्याय पुढे आणला आहे. त्यासाठी बेलापूर सेक्टर-१५ ब येथील भूखंड क्रमांक-३९ वर पाच मजली वाहनतळ विकसित करण्यात आला आहे. सदर कामास २८ कोटी खर्च आला आहे. या बहुमजली वाहनतळात ४७६ चारचाकी आणि १२१ दुचाकी वाहने पार्किंग व्यवस्था असणार आहे. तसेच नवी मुंबई शहरात वाढती इलेट्रिक वाहन संख्या पाहता या ठिकाणी पुरेशा प्रमाणात चार्जींग स्टेशनची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. सद्यस्थितीत या वाहनतळ इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच सदर वाहनतळ नागरिकांसाठी खुले होणार असल्याने बेलापूर भागातील वाहन पार्किंग समस्या सुटणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप