एपीएमसी मार्केट मध्ये टॉमेटो दरात घसरण

किरकोळ बाजारात ९० ते ११० रुपये  

वाशी : मागील दीड-दोन महिन्यांपासून टोमॅटो दराने उच्चांक गाठला होता. मात्र, वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये ‘टोमॅटो'ची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. एपीएमसी बाजारात आवक वाढत असल्याने टोमॅटो दरात देखील किलोमागे १० ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात टॉमेटो दर ४० ते ५० रुपयांवर आले आहेत. तर किरकोळ बाजारात टॉमेटो ९० ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.

चार-पाच महिन्यांपूर्वी टोमॅटो दरात मंदी होती. त्यामुळे कवडीमोल दराने टोमॅटो विक्री होत होती. काही शेतकऱ्यांनी तर १-२ रुपये दराने विक्री झाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देखील दिले होते. मिळत असलेल्या कवडीमोल दराने टोमॅटो लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मागील दीड-दोन महिन्यांपासून ‘टोमॅटो'चे दर गगनाला भिडले होते. जुलै महिन्यानंतर टोमॅटो दरात सातत्याने विक्रमी वाढ होत होती. घाऊक बाजारात प्रतिकिलो १३० रुपये तर किरकोळ बाजारात टोमॅटो १६० रुपयांवर पोचले होते. एरव्ही एपीएमसी बाजारात टोमॅटोच्या ४०-५० गाड्या दाखल होत होत्या. मात्र, उत्पादन घटल्याने एपीएमसी बाजारात अवघी १०-१५ गाडी टोमॅटो आवक होत होती. त्यामुळे ‘टोमॅटो'च्या दराने उसळी घेतली होती. मात्र, आता बाजारात राज्यातील टोमॅटो आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. १७ ऑगस्ट रोजी नाशिक आणि सासवड येथून ‘टोमॅटो'ची आवक वाढली असून, २२-२५ गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बाजारात ५० % आवक वाढल्याने घाऊक टोमॅटो दरात १०-१५ रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो ५५-६० रुपयांनी विक्री होणारे टोमॅटो आता ४०-५० रुपयांवर आले आहेत.

किरकोळ बाजारात टॉमेटो ९० ते ११० रुपये दराने विकला जात आहे. बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असल्याने टोमॅटो दर उतरले आहेत. पुढील दिवसात आणखी टोमॅटो दर उतरण्याची शक्यता एपीएमसी बाजारातील भाजीपाला व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये कर पुनर्निरिक्षण मोहिमेत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण