सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ

किरकोळ बाजारात भाजीपाला दर अनियंत्रीत?

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक भाजीपाला बाजारात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट-तिप्पट दराने विकला जात आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्य वस्तूप्रमाणे भाजीपाला दरांवर देखील नियंत्रण ठेवण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

नवी मुंबई शहरातील वाशी मध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतून मुंबई उपनगरात ‘भाजीपाला'सह इतर ५ खाद्य वस्तूंचे वितरण होते. किरकोळ बाजारात काही टक्के नफा जोडून खाद्य वस्तंूची विक्री केली जाते. मात्र, धान्य, मसाले, फळे, तेल वगळता किरकोळ बाजारात भाजीपाला आणि कांदा-बटाटा यांची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केली जाते. नुकतेच एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात १०० रुपयावर गेलेले ‘टॉमेटो'चे दर ४०-५० रुपयांवर आले आहेत. मात्र, किरकोळ बाजारात ‘टोमॅटो'ची ८०-१०० रुपयांनी विक्री होत आहे. भाजीपाला दर अनियंत्रीतची अवस्था कांदा-बटाटा यांच्यासह इतर भाज्यांच्या बाबतीत देखील आहे. त्यामुळे किरकोळ बाजारवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरु असतो. याची झळ मात्र सामान्य ग्राहकांना बसते. किरकोळ बाजारात नित्यानेच घाऊक भाजीपाला दराच्या दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना देखील योग्य मोबदला मिळत नसून, सामान्य नागरिक देखील भरडला जात आहे. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरावर सरकारचा वचक असणे गरजेचे झाले आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
-----------------------------------------
सर्वसामान्य ग्राहकांना घाऊक बाजारात भाजीपाला खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक किरकोळ बाजारात भाजीपाला खरेदी करतात. मात्र, किरकोळ बाजारात घाऊक दरांपेक्षा दुप्पट-तिप्पट दर आकारले जात आहेत. त्यामुळे शासनाने किरकोळ बाजारात भाजीपाला दरांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. - सोनाली गजभिये, गृहिणी - वाशी.
----------------------------------
एपीएमसी भाजीपाला बाजारात सध्या महाराष्ट्रातील ‘टोमॅटो'सह इतर भाज्यांची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसात गगनाला भिडलेले भाजीपाला दर कमी होत चालले आहेत. मात्र, घाऊक बाजारात भाजीपाला दर घसरुन देखील किरकोळ बाजारात मात्र भाजीपाला दर दुपटीने आकारले जात आहेत. - श्रीकांत पाटील, घाऊक व्यापारी -एपीएमसी मार्केट 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मार्केट मध्ये टॉमेटो दरात घसरण