पाणी टंचाईमुळे इंदिरानगरवासिय त्रस्त

तुर्भे विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी विभागातील इंदिरानगर आणि इतर झोपडपट्टी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मुबलक पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयावर १८ ऑगस्ट रोजी हंडा मोर्चा काढून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

तुर्भे एमआयडीसी विभागामधील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा दोन-दोन दिवस पाणी येत नाही. रात्री-अपरात्री पाणी येत असल्यामुळेही नागरिकांची गैरसोय होत आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे रहिवासी त्रस्त आहेत. नवी मुंबई महापालिकेचे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण आहे. याशिवाय एमआयडीसी विभागात महापालिका एमआयडीसी कडूनही पाणी घेते. नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिका करत आहे. परंतु, इंदिरानगर झोपडपट्टीमधील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. यासंदर्भात वारंवार विभाग कार्यालय आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली, तक्रार केली. पण, पावसाळ्यात सुध्दा येथील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्याकरिता यासाठी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुर्भे इंदिरानगर आणि इतर झोपडट्टीतील रहिवाशांनी ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'च्या झेंड्याखाली १८ ऑगस्ट रोजी तुर्भे विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केले. या मोर्चात ‘शिवसेना'चे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, उपशहरप्रमख महेश कोटीवाले, सिध्दाराम शिलवंत यांच्यासह शेकडो रहिवाशी सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

दरम्यान, सिडको विकसीत नोडप्रमाणे सकाळी आणि सायंकाळी नियमीत वेळेत पाणी पुरवठा करण्यात यावा. इंदिरानगर झोपडपट्टीलाही एमआयडीसी ऐवजी महापालिकेच्या मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा. पाणी टंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी आवश्यक जलकुंभ, जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी महापालिकेकडे केल्या. तसेच येत्या काही दिवसात पाणी पुरवठा सुरुळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही महापालिकेला देण्यात आला आहे.

स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई शहरात आज सर्वच विभागात पाणी टंचाई भासत आहेत. नवी मुंबई शहरात पाण्याचे ढिसाळ नियोजन असल्याने झोपडपट्टी भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. आता हंडा मोर्चा काढला आहे. यावर महापालिकेने गांभीर्याने उपाययोजना केली गेली नाही तर उग्र आंदोलन केले जाईल.  - विठ्ठल मोरे, जिल्हाध्यक्ष-शिवसेना (उबाठा), नवी मुंबई.

तुर्भे एमआयडीसी भागामध्ये ‘एमआयडीसी'च्या वतीने मागील दोन वर्षांपासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. पाणी टंचाईबाबत तुर्भे विभाग कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, प्रशासन गांभीर्याने घेत नाही. वारंवार पाठपुरावा करुन देखील परिस्थिती जैसे थेच आहे. - महेश कोटीवाले, उपशहरप्रमुख-शिवसेना. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ