शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
पनवेल महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम
जनजागृतीपर लघुपट, गाण्याचे लोकार्पण
पनवेल : श्रीगणेशाचे स्वागत आपण भावपूर्ण वातावरणात करतो. परंतु, श्रीगणेशाचे विसर्जन केल्यानंतरचे चित्र अत्यंत विदारक असते. सदर प्रकार टाळायचे असेल तर लोक सहभाग महत्वाचा आहे. म्हणूनच पर्यावरणपूरक गणोशोत्सवाचा उपक्रम पनवेल महापालिकेने हाती घेतला आहे. महापालिकेने सांगितलेल्या पंचसूत्रीचे पालन नागरिकांनी करावे. पर्यावरण पूरक गणोशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
पनवेल महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृतीपर तयार करण्यात आलेल्या ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' असा लघूपट आणि ‘बाप्पा मोरया रे' या गाण्याचे लोकार्पण आयुक्त गणेश देशमुख आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते खारघर येथील लिटल वर्ल्ड मधील बीएमएक्स चित्रपटगृहामध्ये संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रामशेठ ठाकूर कनिष्ठ महाविद्यालाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक संचालक रचनाकार ज्योती कवाडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, दिग्दर्शक सागर आंगणे, चित्रपटातील सहाय्यक मंडळी, आदि उपस्थित होते.
माझी वसुंधरा ३.० अंतर्गत पनवेल महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गत महापालिकेच्या वतीने यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून ब्रॅण्ड फ्रॉफीट ॲडव्हर्टायझिंग या प्रॉडक्शन कंपनी अंतर्गत जनजागृतीपर लघुपट ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' आणि ‘बाप्पा मोरया रे' असे गाणे तयार करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पर्यावरणपुरक गणोत्सव साजरा करावा, पर्यावरणाचे रक्षण केले जावे, असा या मागील हेतू आहे.
पर्यावरणपुरक गणोत्सव साजरा करताना श्रीगणेशाची मुर्ती शाडू मातीची असणे, पर्यावरणपूरक सजावट, कृत्रिम तलावांमध्ये मुर्तीचे विसर्जन, मुर्ती दान अशा विविध उपाययोजना करणे महत्वाचे ठरते. याच पर्यावरणपुरक गणोशोत्सवाचा संदेश नागरिकांमध्ये पोहचणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच सदर लघुपट आणि गाण्याचे महापालिकेच्या फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमातून तसेच प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसारीत करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणोशोत्सवासाठी महापालिकेची पंचसूत्रीः
शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्तीच घरी आणूया.
सजावट करताना प्लास्टिकचा किंवा थर्माकोलचा वापर टाळूया.
डीजे नको, पारंपरिक टाळ, मृदुंगाने भक्ती करुया.
कृत्रिम तलावामध्येच बाप्पाचे विसर्जन किंवा मूर्ती दान करुया.
निर्माल्य, निर्माल्य कलशातच टाकूया.