चिरनेर कलानगरीतील मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत?

बाहेरुन येणाऱ्या तयार गणेशमूर्तींचा कुंभार समाजाला फटका

उरण : गेल्या कित्येक पिढ्यांपासून इतिहास प्रसिध्द चिरनेर गावातील कलानगरीत गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जात असून, सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाची लगबग सुरु आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तीकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, चिरनेर कलानगरीच्या परिसरातच नव्हे तर संपूर्ण उरण तालुक्यात बाहेरुन पेंटींग केलेल्या तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने येथील पिढीजात मूर्तीकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे.

चिरनेर कलानगरीतील पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तीकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. खेड्यापाड्यात गणेश मूर्तींच्या विक्रीची दुकाने थाटली गेली असल्यामुळे, नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत, अशी खंत येथील मूर्तीकार भाई चौलकर, दामोदर चौलकर, संदेश चौलकर, सुनील चौलकर, गजानन चौलकर, नंदकुमार चिरनेरकर, प्रसाद चौलकर, विलास हातनोलकर, जीवन  चौलकर नरेश हातनोलकर यांनी व्यक्त केली. चिरनेर कलानगरीत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम आता  फार कमी झाले असून, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या  मूर्ती पेण येथून  आणून त्यांना रंगकाम करुन त्या ग्राहकांना विकल्या जातात. फार कमी कारखान्यातून शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या  जात आहेत, असेही या मूर्तीकारांनी सांगितले.

गेल्या पाच पिढ्यांपासून आजपर्यंत १०० % गणेश मूर्ती आमच्या कारखानात शाडू मातीच्याच घडविल्या जातात. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्ती पसंत करणारे नवे-जुने ग्राहक आमच्या कारखान्यात येऊन गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच गणेश मूर्तीची बुकींग करतात. आम्ही ग्राहकांच्या पसंतीच्या फोटो नुसार गणेश मूर्ती साकारतो. पण, बाहेरुन येणाऱ्या गणेश मूर्तीमुळे आमच्या गणेश मूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली आहे. -भाई चौलकर आणि सुनील चौलकर, मूर्तीकार.

आमच्या कुंभार समाजाचा पिढीजात व्यवसाय असून आता केवळ  मूर्तीकला जोपासण्या पुरताच सदर व्यवसाय उरला आहे.  यात खूपच चढउतार आहेत. पण, या चढ उताराची पर्वा न करता कला टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. -गजानन चौलकर आणि नंदकुमार चिरनेरकर, मूर्तीकार. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम