उद्यान विभागाचा लेटलतिफ कारभार कारणीभूत

वाशीतील आर्म ब्रीजच्या कामाला दिरंगाई

वाशी : पामबीच मार्गावर वाशी, सेक्टर-१७  येथून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या आम्र ब्रीजचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, या कामात अडथळा ठरत असलेल्या झाडांना तोडणे, स्थलांतर करणे याबाबत मागील दहा महिन्यांपासून उद्यान विभागाकडून परवानगी प्राप्त झालेली नाही. परिणामी, या कामाला आता खीळ बसली आहे.

विकास कामात अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या बाबतीत महापालिका उद्यान विभागामार्फत वृक्ष तोड, स्थलांतर बाबत परवानगी दिली जात आहे. मात्र, महापालिका उद्यान विभागामार्फत वेळेत सदर परवानग्या दिल्या जात नसल्याने अनेक विकास कामांना खीळ बसली आहे. यातील बहुतांश प्रकल्प महापालिकेचे असून त्यात वाशीतील आम्र ब्रीजच्या कामाची देखील हीच अवस्था आहे.

कोपरखैरणे, वाशी, एपीएमसी, कोपरी वरुन येणाऱ्या वाहनांना पामबीच वरुन थेट सायन-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वाशी, सेक्टर-१७ येथील नाल्यावर गोकुळ डेरीच्या मागे आर्म ब्रीज बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामात २१  झाडे अडथळा ठरत आहेत. त्यामुळे सदर झाडे स्थलांतरीत करणे अथवा तोडणे याबाबत स्थापत्य विभागाने उद्यान विभागाकडे ऑक्टोबर २०२२ मध्ये परवानगी मागितली आहे. मात्र, मागणी करुन आता १० महिने उलटले तरी देखील अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे  उद्यान विभागाच्या लेटलतिफ कामाचा फटका आर्म ब्रीजच्या कामाला बसला आहे.

पामबीच वरुन सायन-पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या आर्म ब्रीजचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील महत्त्वाचा टप्पा अलेलेल्या नाल्यातील दोन खाबांचे काम पूर्ण केले आहे. मात्र, पुढील कामात झाडे अडथळा ठरत असून त्याची परवानगी उद्यान विभागामार्फत अजून दिली गेली नाही. परवानगी प्राप्त होताच या पुलाचे काम तातडीने केले जाईल. -संतोष चौधरी, उपअभियंता-वाशी, नवी मुंबई महापालिका.

आर्म ब्रीजच्या कामात बाधीत होणाऱ्या झाडांच्या तोडणे, स्थलांतर करणे बाबतच्या प्रस्तावात काय तांत्रिक अडचणी आहेत. याची तपासणी करुन परवानगी देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. - दिलीप नेरकर, उपायुक्त - उद्यान विभाग - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

चिरनेर कलानगरीतील मूर्तीकारांचा व्यवसाय अडचणीत?