शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
ठाणे महापालिकेत रंगले कवीसंमेलन
ठाणे कवींच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर -विश्वास पाटील
ठाणे : साहित्य अकादमी आणि ठाणे महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य मंच' कार्यक्रमातंर्गत मराठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. यावेळी निमंत्रित कवींनी सादर केलेल्या निसर्गकविता, सामाजिक विषयावर भाषय करणाऱ्या कवितांना रसिकांची चांगलीच दाद मिळाली.
सदर कार्यक्रमास ‘सल्लागार मंडळ, साहित्य अकादमी'चे संयोजक विश्वास पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, ‘मराठी सल्लागार मंडळ'चे सदस्य नरेंद्र पाठक, ‘साहित्य अकादमी'चे पश्चिम क्षेत्रीय अधिकारी ओम नागर उपस्थित होते. तर निमंत्रितांच्या कवी संमेलनास कवी अशोक म्हात्रे, अशोक बागवे, सतीश सोळाकुंरकर, जितेंद्र लाड, स्नेहलता स्वामी, किशोर किणी, आदित्य दवणे उपस्थित होते. यावेळी साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेता एकनाथ आव्हाड, तर युवा पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथ यांचा ठाणे महापालिकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त कवी असून ठाणे शहरात प्रथमच कवी संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ठाणे महापालिकाआणि साहित्य अकादमीचे कौतुक केले.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी मला लिहिते ठेवले, मी मुलांसाठी गोष्टी, कविता लिहिण्याचा प्रयत्नाला ‘साहित्य अकादमी'ने बाल साहित्य पुरस्कार देऊन कौतुकाची थाप दिली. बालसाहित्यामुळे मी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी जोडले गेलो हीच माझी श्रीमंती आहे. भविष्यात देखील मुलांसाठी अधिक चांगले साहित्य लिहण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे बालसाहित्य पुरस्काराचे विजेते एकनाथ आव्हाड यांनी भावना व्यक्त केल्या. तर युवा पुरस्कार विजेत्या विशाखा विश्वनाथ यांनी कवितेच्या बळावर मला पुरस्कार मिळाला असून कोणतेही काम श्रध्देने केले तर ते निश्चित साध्य होत असल्याचे नमूद केले.
यावेळी कवी आदित्य दवणे यांनी माणूस कवितेतून वारीतील माणसांचे दर्शन घडवले. कवी सतीश सोळांकूरकर यांनी एकटा कवितेतून आईविषयी भावना व्यक्त केल्या. कवयित्री स्नेहलता स्वामी यांनी निसर्गकविता सादर केली, तर जितेंद्र लाड यांनी बाई तुला जगण्याची किती घाई? या कवितेतून स्त्रियांचे भावविश्व उलगडले. कवी किशोर केणे यांनी पावसाळा तु साऱ्यांना हवाहवासा कवितेतून पावसाचे महत्व अधोरेखित केले.
सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केले. दरम्यान, जिथे रसिक आहेत, जिथे वाचक आहेत त्या गावोगावी साहित्य अकादमी घेवून जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे प्रा. नरेंद्र पाठक यांनी प्रास्ताविकात नमूद केले.