इर्शाळवाडी येथील तत्पर मदतकार्याची दखल

शासनामार्फत नवी मुंबई महापालिकेस सन्मानपत्र

नवी मुंबई : इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेची अग्निशमन, आरोग्य, स्वच्छता आणि आपत्ती निवारण पथके मदतकार्यासाठी मध्यरात्रीच घटनास्थळी रवाना झाली. या तत्पर मदतकार्य करणाऱ्या पथकांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते, महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले.

सदर सन्मानापूर्वी दुर्घटनास्थळी दुर्गम भागात मदतकार्य करण्यासाठी जात असताना आकस्मिक निधन झालेले महापालिका अग्निशमन विभागाचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच आपत्ती प्रसंगात धाडसाने मदतकार्य करणारे अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन विभागाचे सहकारी पथक, आपत्ती मदतकार्य आणि घनकचरा व्यवस्थापन समुहाचे प्रमुख प्रतिनिधी सहा. आयुक्त शशिकांत तांडेल आणि सहकारी पथक तसेच डॉ. सोनल बन्सल, समूह यांचे आरोग्य पथक या पथकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

सतत ४ दिवस चाललेल्या या मदतकार्यात ‘एनडीआरएफ'च्या जवानांसोबत महापालिकेच्या मदतकार्य पथकांनीही दररोज सक्रिय सहभाग घेतला. तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सुचनांनुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आवश्यक ते साहित्य आपद्‌ग्रस्तांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.

नवी मुंबईतीलच नव्हे तर इतर गांव-शहरातील आपत्ती प्रसंगात महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी नेहमीच मदतकार्य करण्यात पुढाकार घेतलेला आहे. सदरची परंपरा कायम राखत इर्शाळवाडी दुर्घटनेतही नवी मुंबई महापालिका पथकांनी चांगली कामगिरी केली. याचा अभिमान वाटत असल्याचे नमूद करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पथकांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान केला. पथकात सहभागी सर्वच अधिकारी, कर्मचारी यांना लवकरच प्रशस्तीपत्रे प्रदान करुन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात येईल, असेही आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या तत्पर मदतकार्य सेवेबद्दल रायगड जिल्ह्यामार्फत ‘खालापूर'चे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्यामार्फत विशेष सन्मानपत्र स्वातंत्र्यदिनाच्याच दिवशी अभिनंदनपूर्वक प्रदान करण्यात आले. मौजे इर्शाळवाडी, ता. खालापूर येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अत्यंत सचोटीने आणि तत्परतेने शोध आणि बचावकार्य सुरु करुन नैसर्गिक आघाताने निराश्रीत झालेल्या आदिवासी बांधवांना तात्काळ महत्वपूर्ण मदत करुन दिलासा दिल्याबद्दल सदर विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे. केवळ कर्तव्यभावनेने नाही तर भावनिक आणि सामाजिक जबाबदारीने केलेल्या अहोरात्र मदतीबद्दल शासनामार्फत दखल घेण्यात येऊन विशेष पुरस्कार देत सन्मानपत्र प्रदान करण्यात येत असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या तप्तर मदतकार्याची दखल विशेष सन्मानपत्राद्वारे शासनामार्फत घेण्यात आली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी या मदतकार्य पथकांचा विशेष गौरव करण्यात आला. या मदतकार्य पथकातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत प्रशस्तीपत्रकही दिले जाणार आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेत रंगले कवीसंमेलन