घणसोली सेवटर-४ येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित

सेक्टर-१ ते ११ भागातील नागरिकांना नवीन नागरी आरोग्य केंद्राचा होणार लाभ

नवी मुंबई : नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग सकारात्मक पावले उचलत आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घणसोली, सेक्टर-४ येथे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले.
 

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे आणि डॉ. रत्नप्रभा चव्हाण, कार्यकारी अभियंता मदन वाघचौरे, प्रवीण गाढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके, डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ. अजय गडदे तसेच नुतन नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील, माजी नगरसेविका उषा कृष्णा पाटील, सुवर्णा प्रशांत पाटील आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घणसोली विभाग नवी मुंबईतील ‘सिडको'ने विकसित केलेला सर्वात नवीन नोड असून या ठिकाणची लोकसंख्या लक्षात घेता घणसोली गावाव्यतिरिक्त आणखी एक नागरी आरोग्य केंद्र असावे, अशी सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार सेक्टर-१ ते ११ या संपूर्ण क्षेत्रातील नागरिकांना सोयीचे होईल अशा घणसोली, सेक्टर-४ येथील मध्यवर्ती जागेत नवीन नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात येऊन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आरोग्य सेवेची भेट नागरिकांना प्रदान करण्यात आलेली आहे.

यावर्षी अर्थसंकल्प सादर करताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असे विशेषत्वाने नमूद केले होते. त्यानुसार घणसोली येथील नवीन नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येऊन कालमर्यादित नियोजन करीत सदर केंद्र स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रातून बाह्यरुग्ण विभाग, गरोदर मातांची तपासणी, बालकांचे आणि गरोदर आणि मातांचे सर्व प्रकारचे लसीकरण, क्षयरोग तपासणी, हिंवताप तपासणी, संसर्गजन्य रोगांवरील उपचार, डायबेटीस आणि हायपरटेन्शन वरील उपचार तसेच दर बुधवारी नियमित लसीकरण सत्रे अशा विविध आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यात येणार आहेत.

घणसोली, सेक्टर-१ ते ११ या भागातील ६५ हजाराहून अधिक नागरिकांना सेक्टर-४ येथील सदर नवीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राचा लाभ होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी आरोग्य केंद्र सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये अनेक ठिकाणी लिटरबिन्सची दुरावस्था