पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी

नवी मुंबईतील पत्रकारांचे आंदोलन

नवी मुंबई : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेला हल्ला, एकंदरीतच राज्यात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासनाकडून होत असलेली दिरंगाई याच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या संघटनांतर्फे १७ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबईतील पत्रकारांनी १७ ऑगस्ट रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्यानंतर आमदार पाटील यांच्या चार गुंड कार्यकर्त्यांनी महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्याचा नवी मुंबइतील पत्रकारांनी निषेध केला. या आंदोलनात पत्रकारांच्या सर्वच संघटना सहभागी झाल्या होत्या. संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी गँगवार टाईप हल्ला केला होता. त्या हल्ल्यात महाजन जबर जखमी झाले होते. हल्लेखोर चार गुंडांपैकी तीन गुंड सराईत गुन्हेगार आहेत. महाजन यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुंडांवर फक्त चॅप्टर केसेस केल्या आहेत. वास्तविक पाहता त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, राजकीय दबावामुळे तसे घडले नाही.

या प्रकाराचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी पत्रकारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने वाशीचा सर्व परिसर दणाणून गेला. यानंतर ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन पत्रकारांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच यावेळी पोलीस आयुवत भारंबे यांनी पत्रकारांकडून निवेदनही स्विकारले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली सेवटर-४ येथे नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित