दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेसाठी बैठक संपन्न

बैठकीत कृतज्ञता स्मरण सेवा करण्यास इच्छुक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन -भगत

नवी मुंबई : देशातील भूमीपुत्र आणि प्रकल्पबाधितांचे अर्ध्वयू लोकनेते दि. बा. पाटील यांच्या लोकसेवेसाठी समर्पित आणि संघर्षमय कार्यास उजाळा देतानाच कलेच्या माध्यमातून मूलभूत हक्काची जाणीव आणि संघर्ष याबद्दल विद्यमान पिढीसह पुढील पिढीला संघर्षासाठी प्रेरीत करणे या उद्देशाने ‘दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा' या स्फुर्तीदायी उपक्रमाचे आयोजन ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या वतीने करण्यात आलेले आहे. सदरच्या उपक्रमाची व्याप्ती लक्षात घेता सदर स्पर्धा अधिक प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचून, अनेक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेतील विविध गटांमध्ये आयोजित स्पर्धामध्ये सहभागी व्हावेत यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी दिलेल्या वैचारिक, सामाजिक, आर्थिक उन्नतीसह भूमीपुत्र म्हणून प्राप्त करुन दिलेल्या स्वाभिमानाच्या प्रति कृतज्ञता स्मरण सेवा करण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची बैठक १५ ऑगस्ट रोजी वाशी येथे संपन्न झाली.

यावेळी ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत, स्पर्धेचे संयोजन समितीचे सदस्य गजआनन म्हात्रे, समाजसेवक संदीप भगत, ‘दि. बा. पाटील भूमीपुत्र ठेकेदार संघटना-नवी मुंबई'चे अध्यक्ष जितेश म्हात्रे, ‘संस्था'चे प्रवक्ते शैलेश घाग यांच्यासह ‘दिबां'च्या विचाराने प्रेरीत असलेले वाशीगांव, सानपाडा आणि जुईनगर विभागातील नागरिक उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी संघर्षाचे ऊर्जास्थान-दिबा, लोकनेते ‘दिबां'ची विविध प्रकारची आंदोलने, सभागृहातील संसदीय कार्याचा जाज्वल्य इतिहास शोध, बोध घेऊन आर्टिकल (लेख) लिहिणे, व्हिज्युअल डॉक्युमेंटरी (माहितीपट) बनविणे, ‘दिबां'च्या संघर्षशील जीवनातील एखादे आंदोलन समोर ठेवून किंवा कार्याच्या महतीपर स्फुर्तीगीत (लेखन, व्हिडीओ, ऑडीओ) बनविणे, आंदोलनाची चित्र रेखाटने, लघुपट बनविणे, लघुपटाचे पोस्टर डिझाईन साकारणे या स्पर्धा अमर्याद (राज्यासह देशातील सर्वांसाठी) क्षेत्रासाठी असतील, तर यंदाच्या श्रीगणेशोत्सव काळात श्रींसमोर याच संदर्भित विषयांवर आरास देखावा करणे या अंतर्गत स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी नवी मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातून अनेकांनी अर्ज केलेले आहेत. स्पर्धेच्या आयोजनाबाबत देखील विविध वृत्तपत्रांतून प्रसिध्दी, जाहिराती तसेच नवी मुंबई क्षेत्रात बॅनर्स द्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे, अशी माहिती दशरभ भगत यांनी दिली.

दरम्यान, स्पर्धेविषयक अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धा व्यवस्थापक ऋतुजा भगत (८८५०३१५७९५) यांच्याशी संपर्क साधावा किंवा[email protected] या मेलवर, किंवा दि.बा. स्फूर्तीस्थान चळवळ स्पर्धा या फेसबुक पेज वर आणि sphurtisthan / दि. बा. स्फूर्तीस्थान स्पर्धा या इन्स्टाग्राम पेज वर संपर्क साधावा किंवा फॉलो करावे, असे आवाहनही  भगत यांनी केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण शहरातील रस्त्यांवर सर्रास पार्किंगमुंळे उरणकर हैराण